बिबट्याच्या दहशतीवर ‘एक्शन मोड’! ना. उदय सामंत यांनी बोलावली तातडीची बैठक; आज दुपारी होणार ठोस निर्णय

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. विश्वनगर, थिबा पॅलेस आणि नरहर वसाहत परिसरात पसरलेली दहशत दूर करण्यासाठी आता खुद्द राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांनी पुढाकार घेतला असून, आज तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

बैठकीची वेळ आणि ठिकाण

  • वेळ: आज (शनिवार), दुपारी १२.०० वाजता
  • स्थळ: एमआयडीसी रेस्ट हाऊस (MIDC Rest House), रत्नागिरी.

आचारसंहितेमुळे बैठक एमआयडीसीत

सध्या रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शासकीय विश्रामगृहाऐवजी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी ही बैठक रत्नागिरी शहराबाहेर असणाऱ्या एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी होणार निर्णय

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरात वावरणाऱ्या या बिबट्याला तातडीने जेरबंद करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर या बैठकीत चर्चा करून तत्काळ निर्णय घेण्यात येणार आहे.

नागरिकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

ज्या परिसरात (विश्वनगर, थिबा पॅलेस रोड, आंबेशेत इ.) बिबट्याचा वावर आढळून आला आहे, त्या भागातील भयग्रस्त नागरिकांना देखील या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. स्थानिकांना काही सूचना करायच्या असतील किंवा समस्या मांडायच्या असतील, तर त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालकमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असल्याने आज दुपारपर्यंत बिबट्याच्या बंदोबस्ताबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.