मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार यंदा दिवाळीच्या आधी त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे. कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सवलत मूल्याच्या प्रतिपूर्ती पोटी ३५० कोटी रुपये रोखीने प्रदान करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच ऑक्टोबर महिन्याचा पगार त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. एसटीतील पगार दर महिन्याच्या ७ ते १० तारखांना कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतो. परंतु, यंदा विशेष बाब म्हणून दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पगार दिवाळीच्या आधीच एसटी कामगारांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
महापालिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनादेखील बोनस मिळावा, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी ५५ कोटींचा निधी तातडीने द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 26/Oct/2024














