Dapoli: आंजर्ले किनारपट्टीवर ‘डॉल्फिन’चा वावर

दापोली : कोकणचे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात थंडीची चाहूल लागताच निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे. निळ्याशार समुद्राच्या लाटांवर उड्या मारत संचार करणाऱ्या डॉल्फिन माशांनी आंजर्ले किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून, पर्यटकांना जणू काही निसर्गाची अनोखी पर्वणीच मिळाली आहे. यंदा डिसेंबरच्या सुरुवातीलाच सुमारे १० फुटी अजस्त्र डॉल्फिनचे दर्शन घडल्याने पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

​डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दापोली तालुक्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने समुद्रात डॉल्फिनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे मुरूड, हर्णै, लाडघर आणि आंजर्ले या किनारपट्टी भागात डॉल्फिनचा वावर वाढला आहे. प्रामुख्याने ८ ते १० फुटांचे मोठे डॉल्फिन वारंवार दर्शन देत असून, हे दृश्य पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक दापोलीकडे धाव घेत आहेत.

​कोकण किनारपट्टी डॉल्फिनसाठी नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत पोषक मानली जाते. किनाऱ्यालगतचा उथळ आणि चिखलयुक्त समुद्रतळ त्यांच्या संचारासाठी सोयीचा ठरतो. तसेच या भागात विविध प्रकारचे मासे व सागरी जीव मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने डॉल्फिनचा वावर येथे नेहमीच असतो. विशेषतः ‘इंडियन ओशन हम्पबॅक’ आणि ‘बॉटलनोज’ या प्रजातींचे डॉल्फिन येथे नियमितपणे आढळतात.

​सध्या आंजर्ले किनाऱ्यावर डॉल्फिन दर्शनासाठी सहा फायबर नौका कार्यरत आहेत. जिज्ञासू व खेळकर स्वभावाचे हे डॉल्फिन बोटींच्या अगदी जवळ येऊन उड्या मारतात, त्यामुळे पर्यटकांना त्यांचे दर्शन जवळून घडते. अलीकडेच १० फुटी डॉल्फिनचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे दापोलीच्या पर्यटन वैभवात अधिकच भर पडली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 20-12-2025