राजापूर : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू आहे. तालुक्यातील सागवे येथील कारीवणे, हमदारेवाडी फिरणाऱ्या बिबट्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माध्यमिक शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांसह ग्रामस्थांना दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे; मात्र, भविष्यामध्ये हल्ला होण्याच्या भीतीने दोन दिवस पालकांनी मुलांना चिंचाडी शाळेत पाठवलेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून सागवे परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. लोकवस्तीमध्ये फिरणाऱ्या बिबट्याने कधी जंगल परिसरामध्ये तर कधी गोठ्यामध्ये घुसून अनेक शेतकऱ्यांच्या गुरांना मारल्याची माहिती येथील ग्रामस्थ देतात. बिबट्याच्या दहशतीमुळे पालकांनी दोन दिवस चिंचाडी शाळेमध्ये मुलांना पाठवले नव्हते. सद्यःस्थितीमध्ये या शाळेमध्ये मुले जात असली तरी बिबट्याची भीती कायम आहे. त्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा योग्य त्या उपाययोजना करून तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे यासह सागवे आणि परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली जात आहे.
सागवे येथील कारीवणे, हमदारेवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून, शाळकरी मुले, ग्रामस्थांना दिवसाढवळ्या बिबट्या फिरताना दिसला आहे. बिबट्याने गुरांची शिकार केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या लोकवस्तीतील वावरामुळे शेतासह शाळेमध्ये जाण्यास ग्रामस्थ, शेतकरी, शाळकरी मुले घाबरत आहेत. बिबट्याकडून हल्ला होण्याच्या भीतीने दोन दिवस चिंचाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये पालकांनी मुले पाठवलेली नव्हती. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा. – विलास तांबे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, सागवे
सागवे येथील कारीवणे, हमदारेवाडी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्तपणे दिवसाढवळ्या वावर सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातत्याने बिबट्या नागरिकांना दिसत असून, अनेक शेतकऱ्यांच्या गुरांची शिकार करून त्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून तत्काळ बंदोबस्त करावा. याबाबतचे निवेदन वनविभागासह प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे. – मोहन घुमे, भाजप तालुकाध्यक्ष
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 20-12-2025














