“महायुतीचा ‘विराट’ विजय, भाजपचा स्ट्राईक रेट ९० टक्क्यांवर!”; २०२९ च्या विजयाचा हा पाया – अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी : “रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला कमी जागा मिळाल्याची टीका काहींनी केली, पण आम्ही आकड्यांपेक्षा ‘स्ट्राईक रेट’ आणि ‘दूरदृष्टी’वर भर दिला. आजचा निकाल हा २०२९ च्या विजयाचा पाया असून, महायुतीत योग्य समन्वय राखल्यानेच हा ‘विराट विजय’ साकार झाला आहे,” अशी रोखठोक प्रतिक्रिया भाजपचे नेते श्री. अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी नगरपरिषद आणि जिल्ह्यातील इतर निकालांनंतर भाजपच्या या जबरदस्त कामगिरीवर त्यांनी भाष्य केले.

भाजपचा स्ट्राईक रेट जबरदस्त! रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने लढवलेल्या जागा आणि मिळालेले यश हे डोळे दिपवणारे आहे.

  • उमेदवार: ३९
  • विजयी: ३६
  • नगराध्यक्ष: २ पैकी २ ठिकाणी भाजपचा विजय (गुहागर आणि देवरुख).
  • विशेष रणनीती: महायुतीअंतर्गत भाजपने ९ उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभे केले होते, त्यातील ७ उमेदवार विजयी झाले आहेत.

“सत्तेत सहभाग महत्त्वाचा, २०२९ चे टार्गेट फिक्स!”

जागा वाटपावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना अनिकेत पटवर्धन म्हणाले की, “आम्ही तात्पुरता विचार न करता २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. सत्तेत सहभाग असेल तरच पक्षाचा विस्तार होतो. त्यामुळेच मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून जागावाटप केले. हा निर्णय पक्षाच्या हिताचाच होता, हे निकालाने सिद्ध केले आहे.”

भाजपमध्ये येणार ‘यंग ब्रिगेड’

पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बोलताना पटवर्धन यांनी मोठी घोषणा केली. “भाजप आता ‘यंग ब्रिगेड’ला संधी देणार आहे. जुन्या आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तरुणांना पुढे आणले जाईल, जेणेकरून पुढील २५ वर्षे पक्ष भक्कम राहील. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे १० आणि पंचायत समितीत २० सदस्य महायुतीच्या माध्यमातून नक्कीच विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोकणात भाजपचे सुवर्णयुग

४७ वर्षांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा भाजपने जिंकली, ती जागा कायम राखण्यासाठी ही रणनीती आखली आहे. भविष्यात भाजपमध्ये अनेक मोठे प्रवेश होतील आणि कोकणात भाजपला चांगले दिवस येतील, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.