रत्नागिरीत बॅडमिंटनचा थरार सुरू! शिवाजी स्टेडियमवर जिल्हास्तरीय स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ; १०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

रत्नागिरी : जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शनिवारी (दि. २०) शिवाजी स्टेडियम क्रीडा संकुलात मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला. ९ ते १९ वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, कोर्टवर विजयासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रसन्ना अंबूलकर होते. यावेळी व्यासपीठावर असोसिएशनच्या सचिव सौ. सरोज सावंत, सौ. मीना गद्रे, श्री. बिपीन गांधी, श्री. पराग पानवलकर, श्री. फिरोज गवाणकर, राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू सौ. प्रीती रेगे, जी.एस.टी. कमिशनर श्री. विकास पवार, तहसीलदार सौ. तेजस्विनी पाटील, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री. रजनीष महागांवकर, तसेच सभासद श्री. अमित मुळ्ये व श्री. सुधीर बाष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

“खेळातूनच घडतो आत्मविश्वास” – नितीन बगाटे

उद्घाटनप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे स्थान महत्त्वाचे आहे. खेळामुळे शिस्त, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि निकोप स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते. हार-जीत पेक्षा खेळात सहभागी होणे जास्त महत्त्वाचे आहे.” त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे ध्येय – प्रसन्ना अंबूलकर

प्रास्ताविकात बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्ना अंबूलकर यांनी स्पर्धा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. “रत्नागिरीतील मुलांमध्ये अफाट टॅलेंट आहे. त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर भविष्यात आपल्या जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर गाजणारे खेळाडू नक्कीच घडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज बक्षीस वितरण सोहळा

ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून, आज (रविवार, दि. २१ डिसेंबर) सायंकाळी या स्पर्धेचा सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. विविध वयोगटांतील सामने पाहण्यासाठी पालकांनी आणि बॅडमिंटन प्रेमींनी शिवाजी स्टेडियमवर गर्दी केली आहे. या स्पर्धेमुळे रत्नागिरीच्या क्रीडा चळवळीला नक्कीच बळ मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.