रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचा करिश्मा दिसून आला आहे. महायुतीच्या उमेदवार सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी तब्बल २०,०३१ मते मिळवत महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने यांचा ९,३१५ मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला आहे. या निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत रत्नागिरीकरांनी ना. उदय सामंत यांनी शहरात केलेल्या प्रचंड विकासकामांच्या पारड्यात आपली मते टाकली आहेत.
मतमोजणीचा थरार: पहिल्या फेरीपासूनच आघाडी
आज सकाळी १० वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीचे आकडे बाहेर येताच शिल्पा सुर्वे यांनी मोठी आघाडी घेतली होती. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर आणि प्रत्येक प्रभागात शिल्पाताईंची सरशी दिसून येत होती. मतदानाचा हा कल पाहताच महाविकास आघाडीच्या गोटात शांतता पसरली. आपला पराभव निश्चित असल्याचे लक्षात येताच, दुसऱ्या फेरीनंतर मविआच्या उमेदवार शिवानी माने यांचे वडील राजेश सावंत यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.
मतांची अंतिम आकडेवारी : या अटीतटीच्या वाटणाऱ्या लढतीत शिल्पा सुर्वे यांनी एकतर्फी विजय मिळवला.
- शिल्पा सुर्वे (महायुती): २०,०३१ (विजयी)
- शिवानी माने (महाविकास आघाडी): १०,७१६
- वहिदा मुर्तुझा: ३,०१९
- प्राजक्ता कीणे: ५११
- संध्या कोसुंबकर: ५०६
- सुश्मिता शिंदे: ३१५
- नोटा (NOTA): ५७०
४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त?
या निवडणुकीत लढणाऱ्या इतर उमेदवारांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एकूण वैध मतांच्या १/६ (एक षष्ठांश) मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत रक्कम (Deposit) जप्त होते. या निवडणुकीत पडलेली एकूण वैध मते पाहता वहिदा मुर्तुझा, प्राजक्ता कीणे, संध्या कोसुंबकर आणि सुश्मिता शिंदे या चारही उमेदवारांना १/६ मते मिळवता आलेली नाहीत. त्यामुळे या चारही जणांची अनामत रक्कम जप्त होण्याची दाट शक्यता आहे.
विकासावर पडली मोहर
गेल्या पाच वर्षांत ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून शहरात झालेले रस्ते, थिबा पॉईंट सुशोभिकरण, नाट्यगृह आणि विविध विकास प्रकल्प यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. विजयानंतर शिल्पा सुर्वे समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.











