रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेसह जिल्ह्यातील निवडणुकांचे निकाल आजच जाहीर झाले आहेत. महायुतीने या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत यश मिळवले आहे. मात्र, विजयाचा गुलाल खाली पडण्याआधीच आता जिल्ह्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.
निवडणूक निकालाच्या पहिल्याच दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात निवडून आलेल्या उबाठा गटाच्या नगरसेवकांपैकी तब्बल ८० टक्के नगरसेवक हे राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संपर्कात आहेत. निकाल लागताच काही तासातच उबाठाच्या अनेक नगरसेवकांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे.
विजयानंतरही ठाकरे गटात चलबिचल?
आज लागलेल्या निकालात महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगरपालिकेत विरोधकांचा ‘सुपडा साफ’ झाला आहे. असे असताना, जे बोटावर मोजण्याइतके उबाठा गटाचे नगरसेवक जिल्ह्यात निवडून आले आहेत, त्यांनीही निकालाच्या दिवशीच सत्तेच्या दिशेने पावले टाकल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरीतील नगरसेवकांचाही समावेश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात उबाठा गटाचे हे नगरसेवक मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामध्ये रत्नागिरी शहरातील निवडून आलेल्या उबाठा नगरसेवकांचाही प्रामुख्याने समावेश असल्याचे समजते.
कोकणाच्या राजकारणात पुन्हा बदल?
विकासकामे आणि निधीसाठी सत्ताधारी पक्षात असणे आवश्यक असल्याची जाणीव या नगरसेवकांना झाल्यानेच त्यांनी उदय सामंत यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. जर हे प्रवेश झाले, तर कोकणातील आणि विशेषतः रत्नागिरीतील विरोधी पक्षांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसांत कोकणाच्या राजकारणात मोठे बदल झालेले पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आज जिंकलेले ‘मशाल’ वाले नगरसेवक उद्या ‘धनुष्यबाण’ हाती घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














