गुहागर : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर गुहागर तहसीलदारांनी कारवाई केली. बुधवारी मध्यरात्री वाहन पकडून तातडीने पंचनामा करून कारवाई केल्याने अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर अवैध वाळू उपसा करून चढ्या दराने वाळू विक्री केली जात होती. महसूलची यंत्रणा नगरपंचायत निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा घेत हा प्रकार सुरू होता. येथील सर्कल अधिकारी, तलाठी व तहसीलदार परीक्षित पाटील यांनी या अवैध व्यवसाय विरोधात कठोर धोरण अवलंबिले. दोन दिवसांपूर्वी रात्री या अवैध व्यवसायावर स्वतः तहसीलदार यांनी लक्ष ठेवले होते. वाळू उपसा करून जवळच्या मार्गाने जात असताना अर्धा ब्रास वाळू वाहतूक करणारे वाहन रात्री साडेअकरा वाजता पकडले.
वाहन पकडताच काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याला न जुमानता तहसीलदार परीक्षित पाटील यांनी थेट कारवाई केली आहे. याप्रकरणी पुष्कर पावस्कर यांना २५ हजार रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. पकडलेल्या वाहनाची कोणतीही कागदपत्रे नाहीत. अशातच सदर वाहनावर आरटीओ विभागाच्या कारवाईबरोबर बंदपत्र करून प्रांताधिकारी कार्यालयात पुढील मोठ्या दंडासाठी प्रस्ताव केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 22/Dec/2025














