देवरुख : जामनगर व पोरबंदर या दोन्हीही एक्स्प्रेसना संगमेश्वर स्थानकात थांबा मिळाल्यामुळे तालुक्यातील जनतेची चांगली सोय झाली आहे. यासाठी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक समूहाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
गाडी क्रमांक २०९१०/२०९०९ पोरबंदर कोचिवेली सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि १९५७७/१९५७८ (द्वि साप्ताहिक) जामनगर तिरुनलवेली एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना संगमेश्वर रोड हा थांबा रेल्वे बोडनि मंजूर केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालय, तसेच मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम तसेच रेल्वे बोर्ड व कोकण रेल्वे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केले.
चिपळूण-संगमेश्वर फेसबुक समूहाने आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला. यासाठी वेळप्रसंगी आंदोलनेदेखील पुकारली होती. रेल्वे बोर्डाकडून सतत थांब्यासाठी नापसंती दिली जात होती. समूहाने संगमेश्वर येथे थांबा किती आवश्यक आहे हे पटवून देण्याचे काम केले. संगमेश्वर रेल्वे स्टेशनमधून कोट्यवधी रुपयांचा कसा नफा कोकण रेल्वेला मिळत होता हेदेखील पटवून देण्यात समूह यशस्वी झाला.
छत्रपती संभाजी महाराज यांचे शासनाकडून कसबा याठिकाणी मोठे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या देशवासियांना संगमेश्वर थांबा झाल्यास लाभ होणार आहे. पर्यटकांचा ओघदेखील वाढेल हे देखील समूहाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. समूहाच्या पाठपुराव्याला यश येऊन दोन एक्स्प्रेसना थांबा मिळाला आहे. समूह संघटनेचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तालुक्यातील रेल्वेप्रवासी आणि जनतेकडून कौतुक करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 22/Dec/2025














