दापोली : विधवा प्रथा कायमस्वरूपी मोडीत निघावी यासाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसून, शासन निर्णय केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे वास्तव समोर येत आहे.
विधवा महिलांचा समाजात सन्मान व्हावा यासाठी पतीच्या निधनानंतर अंत्यविधीपूर्वी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे, कुंकू पुसण्यासारख्या अमानवी प्रथांना पूर्णविराम देण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयाचे राज्यभर स्वागत झाले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक ठिकाणी होत नसल्याचे दिसून येत आहे. या शासन निर्णयाचे वाचन राज्यभरातील ग्रामसभेत करण्यात आले होते. दुर्गम भागातील गावांनी सामाजिक जाणीव दाखवत या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली, आणि यातून त्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्यपातळीवर आदर्श निर्माण केला मात्र तथाकथित ‘प्रगत’ गावांमध्येच या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. यामधून जुनाट रूढी, अंधश्रद्धा या समाजात घट्ट रुजलेली असल्याचे दिसून येते.
निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने या विषयावर राज्यभर व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. सामाजिक सुधारणेचा हा निर्णय केवळ कागदापुरता न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा या निर्णयाचे महत्त्वच कमी होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 22/Dec/2025














