खेड : निसर्गाने वरदहस्त ठेवलेल्या कोकणाच्या किनाऱ्यावर दरवर्षी लाखो पर्यटक गर्दी करतात. समुद्र, धबधबे, डोंगर, नदी, जैवविविधतेने नटलेला परिसर सगळं काही असताना कोकणात अजूनही सुट्टीचा अनुभव अधिक समृद्ध करणारे बहुआयामी पर्यटन स्थळाची कमतरता जाणवत होती. त्यात भर घालणारा एक अनोखा उपक्रम ना. योगेश कदम यांच्या प्रयत्नातून खेड शहराच्या जगबुडी नदीकिनारी आकार घेत होता क्रोकोडाईल पार्क. पण, दुर्दैवाने गेली चार वर्षे हा प्रकल्प प्रत्यक्षात कागदावरून पुढे सरकलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या वन विभाग, पर्यावरण विभाग यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीत अनेक वर्षांपासून मोठ्या आकाराच्या, महाकाय मगरी वास्तव्य करत आहेत. स्थानिकांना या मगरींना पाहण्याचा अनुभव नवीन नाही, मात्र या नैसर्गिक संपत्तीचा पर्यटनविकासासाठी उपयोग व्हावा यासाठी नागरिक आणि प्राणीप्रेमींची अनेक वर्षांपासून त्यांच्या संवर्धनाची व संरक्षणाची मागणी होत आहे. खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री योगेश कदम यांनी या मागणीला बांधील राहून क्रोकोडाईल पार्कचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. शिवसेना नेते रामदास कदम आणि या नामदार योगेश कदम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रकल्पाला राज्य सरकारची ९ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली.
शासनाच्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेडमध्ये येऊन जगबुडी नदीची प्रत्यक्ष पाहणी केली. पुर्ण अभ्यासानंतर पार्कचा आराखडा तयार करण्यात आला. योग्य जागा, सुरक्षाव्यवस्था, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा या सर्वांचा तपशीलवार अहवालही तयार करण्यात आला. यामुळे खेड तालुका आणि कोकणातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले होते. कोकणातील हे पहिलेच क्रोकोडाईल पार्क ठरणार असल्याने जिल्ह्याचे नाव पर्यटन नकाशावर दिसेल अशी आशा होती.
मात्र, या सर्व प्रक्रियेनंतरही गेल्या चार वर्षांपासून प्रकल्प पूर्णपणे ठप्प आहे. निधी मंजूर असूनही काम सुरू न झाल्याने स्थानिक नाराज आहेत. जगबुडी नदीचा परिसर पाहण्यास, संशोधन व छायाचित्रणासाठी अनेक बाहेरील पर्यटक येतात. अधिकृत पार्क सुरू झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून व देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येऊ शकतील. पर्यटन वाढल्यास रोजगार निर्मिती, स्थानिक व्यावसायिकांची व्यवसाय वाढ, खेडची स्वतंत्र पर्यटन ओळख अशा अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकणार आहेत.
कोकणाच्या पर्यटनाला नवी झेप मिळावी !
कोकणातील निसर्गरम्य सौंदर्याला पूरक असा हा प्रकल्प पर्यटकांसाठी नवा आकर्षणकेंद्र बनू शकतो. समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त पर्यटनाला नवी दिशा देणारे हे पार्क शासनाच्या दुर्लक्षामुळे रखडले आहे, हीच खंत. आता एकच प्रश्न मंजूर प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी किती वर्षांची वाट पाहायची? खेडवासीयांची अपेक्षा स्पष्ट आहे की, क्रोकोडाईल पार्कचे काम तातडीने सुरू व्हावे आणिकोकणाच्या पर्यटनाला नवी झेप मिळावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 22/Dec/2025









