रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ३२ पैकी २९ जागा जिंकत इतिहास रचला आहे. या विजयाच्या त्सुनामीत प्रभाग क्रमांक ५ मधील महायुतीचे उमेदवार आणि तरुण उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी ‘रेकॉर्डब्रेक’ कामगिरी नोंदवली आहे. संपूर्ण शहरात निवडून आलेल्या २९ नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य (Highest Lead) घेण्याचा बहुमान सौरभ मलुष्टे यांनी पटकावला असून, त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा तब्बल १ हजार ३३६ मतांनी पराभव केला आहे.
सामाजिक कार्याची पावती
सौरभ मलुष्टे यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्या सामाजिक कार्यातून प्रभागात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अडीअडचणीला धावून जाणारा तरुण आणि उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या या कामाची दखल प्रभाग ५ मधील सुज्ञ नागरिकांनी घेतल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
दिग्गजांना धूळ चारली
सौरभ मलुष्टे यांच्यासमोर उबाठा गटाचे प्रवीण नांदगावकर आणि उबाठा गटाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या पत्नी प्रतिमा साळुंखे यांचे तगडे आव्हान होते. विरोधकांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, सौरभ मलुष्टे यांनी केलेल्या कामाची शिदोरी आणि मतदारांचा विश्वास यामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले. १,३३६ मतांचे प्रचंड मताधिक्य मिळवत त्यांनी विरोधकांना एकतर्फी धूळ चारली.
सामंत बंधूंच्या पाठिंब्यामुळे विजय सुकर
या देदिप्यमान विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी आपल्या यशाचे श्रेय राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत आणि आ. किरण (भैय्या) सामंत यांना दिले. “सामंत साहेबांचा आशीर्वाद आणि पाठिंबा तसेच मतदारांचे प्रेम यामुळेच हा ऐतिहासिक विजय सहज शक्य झाला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महायुतीचा ‘शिलेदार’ नंबर १
रविवारी (२१ डिसेंबर) सकाळी निकाल जाहीर होताच महायुतीचे एक-एक शिलेदार विजयी मुद्रेने बाहेर येत होते. पण जेव्हा सौरभ मलुष्टे यांचा निकाल आणि मताधिक्य जाहीर झाले, तेव्हा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांमध्ये सौरभ मलुष्टे ‘नंबर १’ ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.














