चिपळूण : कोयना वीज प्रकल्पअंतर्गत सर्जवेलला लागलेल्या गळतीमुळे गेली दोन-तीन वर्षे कुंभार्ली घाटातून धबधबा वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर कोयना वीज प्रकल्पाने ही गळती काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरुवारपासून कोयना वीज प्रकल्पांतर्गत पोफळी येथील टप्पा-१ व २ ची वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. यामुळे ६०० मेगावॅट वीजनिर्मिती कमी होणार आहे. परिणामी, चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कोंडफणसवणे आणि मुंढे या तीन गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यात असणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून टप्पा-१, २, ३ व ४ मधून १९२० मेगावॅट वीज तयार केली जाते. पहिल्या टप्प्यात ७० मेगावॅटची चार युनिट, दुसऱ्या टप्प्यात ८० मेगावॅट क्षमतेची चार युनिट वीजनिर्मिती केली जाते. कोयना धरणातून पाणी उचलून ते बोगद्याद्वारे पोफळी येथील वीजनिर्मिती केंद्रात आणण्यात येते. यानंतर वीजनिर्मिती होऊन वाहणारे अवजल बोगद्यातून कोळकेवाडी धरणात सोडले जाते व कोळकेवाडी धरणातून हे पाणी पुन्हा वीजनिर्मिती करून वाशिष्ठी पात्रात सोडले जाते. मात्र, तीन वर्षांपूर्वी कोयना धरणातून पोफळी येथे वीजनिर्मिती करणाऱ्या संचाला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्जवेलला गळती लागली व हे पाणी सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे वाहत असल्याचे दृश्य कुंभार्ली घाटातून काही वर्षे दिसत होते. त्यातून कोयना धरणाला गळती लागल्याचीही अफवा पसरली होती.
अखेर पाटबंधारे विभागाच्या प्रयत्नानंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाने ही गळती काढण्यास मंजुरी दिली असून हिवाळ्यामध्ये वीजनिर्मिती कमी असते. त्यामुळे टप्पा १ व २ बंद ठेवून ही गळती काढली जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे. पहिला टप्पा सुमारे ४५ दिवसांचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा परवानगी घेऊन दुसऱ्या टप्प्यात देखील काम होणार आहे.
१० लाख लिटर पाण्याची साठवण…
गुरुवारपासून कोयना वीज प्रकल्पाचे टप्पा १ व २ बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, वीजनिर्मिती या टप्प्यातून थांबली आहे. त्यामुळे तालुक्यातील शिरगाव, कोंडफणसवणे व मुंढे या तीन गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे तर टप्पा ३ आणि ४ हे सुरळीत राहणार असून, त्यातून कोळकेवाडी धरणात पाणी येणारच आहे. त्यामुळे त्यातून पुन्हा हे पाणी वाशिष्ठीला सोडण्यात येणार आहे. तीन गावांच्या पाणीपुरवठा समस्येवर १३ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या संदर्भात कार्यकारी अभियंता विश्वनाथ सानप व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. भविष्यातील पाणी टंचाई संदर्भात आमदार शेखर निकम यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सानप यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार पोफळी महानिर्मिती कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय चोपडे यांनी ग्रामस्थांबरोबर बैठक घेतली. ग्रामस्थांची पाणी टंचाई सोडविण्यासाठी १० लाख लिटर पाणी साठवून ठेवले आहे, ते त्यांना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 22/Dec/2025














