रत्नागिरी : जिल्हा अल्पसंख्याक कक्षामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा लाभ संबंधितांनी घेण्याबाबत त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी तसेच या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अमर पाटील यांनी केले.
जिल्हा अल्पसंख्याक कक्षामार्फत नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पाटील म्हणाले, अल्पसंख्याक कक्षामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविणे. अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्यातील मदरशांना पायाभुत सुविधा पुरवणे. निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण प्रस्तावांची छाननी करुन शासनास सादर करणे, अल्पसंख्याक शाळांना धार्मिक व भाषिक दर्जा योजना राबविण्यात येतात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी याची माहिती सर्वांपर्यंत समाजातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. त्याचबरोबर अल्पसंख्याक कल्याणाकरिता १५ कलमी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबाबतही माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी अमर पाटील यांनी केले.
यावेळी इम्तियाज सिध्दीकी व इक्रा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष इलियास बगदादी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गवाणकर उपस्थित होते. राधिका भाटवडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 22/Dec/2025














