चिपळूण : वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यावर्षीच्या कृषी महोत्सवात पशुधन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ ते ९ जानेवारी दरम्यान शहरातील स्वा. सावरकर मैदानात वाशिष्ठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. दि. ६ रोजी पशुधन स्पर्धा व दि. ८ रोजी पाककला स्पर्धा होणार आहे.
दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. पशुधन स्पर्धा होईल. सकाळी ८ वा. सर्वात जास्त दूध देणारी गाय व म्हैस यांची स्पर्धा होईल. सकाळी १० वा. देशी किंवा संकरित वासरू मेळावा व स्पर्धा होईल. तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण होणार आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मर्यादीत असून प्रत्येकाने आपले पशुधन बरोबर घेऊन यावे. सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर वक्षीस, चषक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर पारितोषिक वितरण ९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. होईल. पशुधन स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १०, ७ व ५ हजार रूपये असे रोख बक्षीस तसेच चषक व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
याच महोत्सवात पाककला स्पर्धा देखील होणार आहे. या स्पर्धा जिल्हा मर्यादित असून वाशिष्ठी दुग्धजन्य पदार्थापासूनच बनविले जाणारे पदार्थ या स्पर्धेत ठेवता येणार आहेत. स्पर्धक गोड किंवा तिखट पदार्थ तयार करू शकतात. गोड आणि तिखट या दोन गटांसाठी बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धकांनी रेसिपी लिहून आणावी. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल ९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी मिल्कच्या प्रवर्तक स्वप्ना यादव व अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 22/Dec/2025














