राजापूर घरफोडीतील दोन सराईत गुन्हेगारांना धाराशिवमधून अटक

रत्नागिरी : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना एका स्कॉर्पिओ वाहनासह आणि घरफोडीच्या साहित्यासह ताब्यात घेतले आहे. ही घटना २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील कोळवणखडी (खालची मोरेवाडी) येथे घडली होती.

फिर्यादी सदानंद शांताराम मोरे (वय ५५ वर्षे) यांच्या घराच्या किचनच्या खिडकीतून दोन आणि मुख्य दरवाजातून दोन अशा एकूण चार अज्ञात इसमांनी प्रवेश केला होता. आरोपींनी घरातील पैशांचा डब्बा चोरून लुटमारीचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली होती. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे, हा गुन्हा धाराशिव जिल्ह्यातील सुनील पवार आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात आरोपींचा शोध घेतला. अखेर २१ डिसेंबर २०२५ रोजी इंदापूर हायवे येथे सापळा रचून सुनील भिमा पवार (वय २७, रा. मोहा, जि. धाराशिव) आणि अजय उतरेश्वर गवळी (वय २०, रा. पिंपळवाडी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन साथीदारांचीही ओळख पटली आहे. सध्या राजापूर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 22/Dec/2025