खेड : मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकी टेम्पोचा ताबा सुटून तो महामार्गावरच पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
हा अपघात मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या वशिष्ठी डेअरीसमोर झाला. सध्या या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असून वाहतूक एकाच लेनवरून सुरू आहे. दुसऱ्या लेनचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे या मार्गावर अडचणी निर्माण होत आहेत. याच एकाच लेनवरून जात असताना समोर आलेल्या रिक्षाला वाचवण्याच्या नादात टेम्पो चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि नरेंद्र महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोणालाही दुखापत नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. काही वेळानंतर पलटी झालेला टेम्पो बाजूला करून वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेऊन वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 22/Dec/2025














