गुहागर : दुचाकीची चावी खाली पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून सुजल प्रकाश गमरे याने आपला मित्र नितेश सुरेश पवार याच्यासह त्याच्या वृद्ध आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आबलोली येथे घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश सुरेश पवार आणि सुजल प्रकाश गमरे हे मित्र असून २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आबलोली बाजारपेठ येथून जात असताना हा प्रकार घडला. नितेशने सुजलला दुचाकीची चावी देताना ती चुकून खाली पडल्याने सुजलने नितेशशी वाद घातला. त्यानंतर सुजलने नितेशला आबलोली येथील डी.एड. कॉलेजच्या हॉस्टेल मैदानावर नेऊन जुन्या वादाचा राग मनात धरून शिवीगाळ करत मारहाण केली.
नितेशने मदतीसाठी आपल्या कुटुंबाला बोलावले असता, सुजलने त्यांच्यावरही हल्ला चढवला. यावेळी सुजलने नितेशची आई सुरेखा सुरेश पवार यांना जोरात ढकलून दिले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला व हाता-पायाला दुखापत झाली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले वडील सुरेश रामा पवार यांना सुजलने लाकडी दांडक्याने कमरेवर मारून जमिनीवर पाडले, यात त्यांच्या हनुवटीला, कपाळाला आणि कानाला गंभीर जखमा झाल्या आहेत. याची तक्रार दाखल 21 डिसेंबर 2025 रोजी 11.22 वाजता गुहागर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 22/Dec/2025














