रत्नागिरीत घुमले पोवाडा आणि लावणीचे सूर! ‘नाटक तमाशाचं’ प्रयोगाला रसिकांची दाद; सावरकर नाट्यगृहात रंगला लोककलांचा जागर

◼️ २०-२२ कलाकारांच्या संचाने जिंकली रत्नागिरीकरांची मने; मनोरंजनातून प्रबोधनाचा अनोखा प्रयत्न

रत्नागिरी : कोकण ही कलावंतांची खाण आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा रविवारी (दि. २१ डिसेंबर) सावरकर नाट्यगृहात आला. निमित्त होते, “नाटक तमाशाचं” या बहारदार नाट्यप्रयोगाचे! महाराष्ट्राची लोकधारा आणि लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या नाटकाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. गण, गवळण, पोवाडा आणि लावणीच्या ठेक्यावर सावरकर नाट्यगृह अक्षरशः दुमदुमून गेले.

एकाच मंचावर महाराष्ट्राच्या लोककलांचे दर्शन लेखक प्रदिप शिवगण यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि युवा कलाकार ऋषिराज किशोर धुंदूर याने दिग्दर्शित केलेल्या या नाटकात सुमारे २० ते २२ कलाकारांचा संच सहभागी झाला होता. हे केवळ नाटक नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा एक दस्तावेज ठरला. नाटकात तमाशाची निर्मिती, त्यातील विविध प्रकार, लावणीचे प्रकार, गण, गोंधळ, भारूड, छक्कड, तुमडी आणि वीररस प्रधान पोवाडा यांचे सादरीकरण इतके ताकदीचे होते की प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दाणाणून गेले. विशेषतः इंट्रोडक्शन, गवळण आणि बतावणी या विनोदी प्रहसनांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.

युवा कलाकारांची दमदार कामगिरी या नाटकाचे दिग्दर्शन करणाऱ्या ऋषिराज धुंदूर याने स्वतः शाहीराची (गायक) भूमिका अत्यंत उत्तमरीत्या सांभाळली.

नृत्यदिग्दर्शन: आकांक्षा साळवी

कथेतील सूत्रधार: दीपक माणगांवकर

नाटकाचा मुख्य सूत्रधार: मिथुन पवार

“दर्दी रसिकांची दाद हीच पावती” या नाटकाचा पहिला प्रयोग २०१६ साली रत्नागिरीतील खातू नाट्यमंदिरात झाला होता. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज सावरकर नाट्यगृहापर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रयोगाबद्दल बोलताना दिग्दर्शक ऋषिराज म्हणाले, “प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी नसली तरी जमलेले ‘मायबाप’ प्रेक्षक हे खरे ‘दर्दी’ होते. प्रत्येक लोककला प्रकाराला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. इथेच आम्ही सर्वांची मने जिंकली, याचे समाधान आहे. याचसाठी केला होता अट्टाहास…”

संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग करण्याचा मानस मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या या नाटकाचे प्रयोग आता केवळ कोकणापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा मानस या टीमने व्यक्त केला आहे. मराठी मातीतील रांगड्या लोककला आणि तमाशावर आधारित या कार्यक्रमाची सांगता भैरवीने झाली.

अशा या अस्सल मराठमोळ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रसिकांनी आणि आयोजकांनी संपर्क साधावा, असे आवाहन टीमने केले आहे.

प्रयोगासाठी संपर्क: ऋषिराज धुंदूर : ७३८७७७२४८५

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 22-12-2025