दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ई-केवायसी, युडीआयडी अत्यावश्यक

चिपळूण : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्राला आधारकार्डशी ई-केवायसी करणे व युडीआयडी कार्ड काढणे बंधनकारक आहे. याबाबत तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सर्व ग्राममहसूल अधिकारी व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

राज्यशासनाच्या १८ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासननिर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वाडीनिहाय व सोयीनुसार विशेष ई-केवायसी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तहसीलदारांच्या सूचनेनुसार, ग्राममहसूल अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आधारकार्डशी ई-केवायसी करून घेण्यासाठी महा ई-सेवाकेंद्रचालकांशी समन्वय साधावा. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांचीही मदत घ्यावी व ठरवण्यात आलेल्या दिवशी कॅम्पचे आयोजन करावे. या प्रक्रियेनंतर केलेल्या ई-केवायसीबाबतचा सविस्तर अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, चिपळूण तालुक्यातील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे युडीआयडी कार्ड अद्याप काढलेले नाहीत किंवा ज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र जुने आहे अशा लाभार्थ्यांसाठी २३ रोजी कामथे उपजिल्हा रुग्णालयात विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात सकाळी ठीक १० वा. उपस्थित राहून दिव्यांग प्रमाणपत्राचे नूतनीकरण तसेच युडीआयडी कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 22-12-2025