Guhagar Vijapur Highway| गुहागरातील दुकानांच्या बांधकामांचा मलबा हटविला

गुहागर : शहरातील नाक्यामध्ये गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. नाक्यामध्ये अवजड वाहन आल्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. महामार्ग कामांतर्गत नाक्यातील दुकाने दुकानदारांनी मोकळी करून दिली. मात्र दुकानांच्या बांधकामाचा मलबा रस्त्याशेजारीच पडून होता. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारास जाब विचारत जेसीबीने रस्ता मोकळा केला आहे.

गुहागर-विजापूर महार्मागाला गुहागर शहरातील नाक्यावरुन सुरुवात होते. गेले अनेक दिवस शहरामध्ये असलेले दुकानदार, रहिवासी व प्रशासन यांच्यामध्ये ही कामे व मोबदल्याबाबत न्यायालयात वाद सुरु होते. मात्र हे वाद संपल्यावर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी संबंधित मालकांना त्यांचा मोबदला नियमानुसार दिला व जागा खाली करण्याच्या नोटीस बजावल्या.

यानंतर संबंधित मालकांनी सर्व दुकाने रिकामी केली व स्वखर्चाने दुकानातील लाकडी सामान काढून घेतले. मात्र भिंती व अन्य सामान तसेच होते. मातीचा मलबा रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी होत होती. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष सतिश मोरे व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर ठेकेदाराने जेसीबीने भिंती पाडून मलबा हटविला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 23/Dec/2025