Ratnagiri Gogate Jogalekar College | गोगटे महाविद्यालयाचे विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत यश

रत्नागिरी : विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे अंतिम सादरीकरण मुंबई विद्यापीठ विद्यार्थी भवनात पार पडले. विद्यार्थ्याच्या आविष्कार संशोधन स्पर्धेत पदवी स्तरावर १-मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला या गटातून रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रकल्पाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमधून एकूण १२ प्रकल्प सहभागी होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने ‘शाश्वत विकास ध्येये १७ च्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत स्तर मूल्यमापन प्रणाली’ या विषयावर संशोधन सादर केले गेले. याची माहिती संकलन व सादरीकरण सेजल भार्गव मेस्त्री व प्रथम गणेश बंडवे या विद्यार्थ्यांनी केले. हा प्रकल्प महाविद्यालय, जिल्हास्तर, विद्यापीठस्तर पोस्टर सादरीकरण आणि अंतिम सादरीकरणासाठी निवडला गेला.

या प्रकल्पासाठी प्रशासकीय उपप्राचार्य व विभागप्रमुख प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सहाय्यक प्राध्यापक विनायक गावडे, सहाय्यक प्रा. सोनाली कुरतडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 23/Dec/2025