राजापूर (रत्नागिरी): राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे मध्यरात्री घरात घुसून दहशत माजवत लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि राजापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, धाराशिव (उस्मानाबाद) येथून आलेल्या सराईत गुन्हेगारांना इंदापूर हायवेवर सापळा रचून अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्हा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय होती?
दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कोळवणखडी (खालची मोरेवाडी) येथे ही खळबळजनक घटना घडली होती. येथील रहिवासी श्री. सदानंद शांताराम मोरे (वय ५५) यांच्या घरात चार अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत प्रवेश केला होता.
यातील दोन चोरटे किचनच्या खिडकीतून तर दोन मुख्य दरवाजातून आत घुसले. त्यांनी घरातील पैसे साठवण्याचा डब्बा (ज्यात अंदाजे १,००० ते १,२०० रुपये होते) पळवत लुटमारीचा प्रयत्न केला. मध्यरात्री अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोरे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले होते. या घटनेनंतर संपूर्ण राजापूर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची चक्रे कशी फिरली?
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी तातडीने तपासाची सूत्रे हालवली. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. या गुन्ह्याचे धागेदोरे धाराशिव जिल्ह्यातील मोहा (ता. कळंब) येथील सराईत गुन्हेगार सुनिल पवार याच्याशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले.
इंदापूर हायवेवर थरारक अटकनाट्य आरोपींच्या मागावर असताना, २१ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य आरोपी आपल्या साथीदारासह इंदापूर हायवेवर येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांच्या पथकाने तिथे सापळा रचला. संशयित आरोपी स्कॉरपिओ वाहनातून आले असता, पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य आणि स्कॉरपिओ गाडी जप्त करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी: १) सुनिल भिमा पवार (वय २७, रा. पारधी वस्ती, मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) २) अजय उतरेश्वर गवळी (वय २०, रा. पिंपळवाडी, लाखनगाव, ता. वाशी, जि. धाराशिव)
प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या इतर दोन साथीदारांची नावेही निष्पन्न झाली आहेत. राजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
यांनी केली यशस्वी कामगिरी ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:
पोलीस निरीक्षक: श्री. नितीन ढेरे (LCB), श्री. अमित यादव (राजापूर)
अधिकारी व अंमलदार: पोउनि. सुधीर उबाळे, श्रेणी पोउनि. संदीप ओगले, पोहवा विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दिपराज पाटील, गणेश सावंत, सत्यजीत दरेकर, रामकृष्ण कात्रे आणि नितीन घोगले. रत्नागिरी पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 23-12-2025














