Chiplun : पिंपळी-नांदिवसे पूल काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

चिपळूण : पिंपळी-नांदिवसे मार्गावरील पूल २३ सप्टेंबर रोजी कोसळल्यानंतर सुमारे १६ गावांचे दळणवळण पूर्णतः विस्कळीत झाले आहे. या मार्गावरून हजारो कामगार, विद्यार्थी तसेच औद्योगिक मालवाहतूक होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पुलाच्या कामासंदर्भात २४ डिसेंबरला रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. यानंतर एमआयडीसीच्या उपअभियंत्यांनी हे काम काही दिवसांत सुरू करू, असे आश्वासन दिल्याने २४ रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र ५ जानेवारीपूर्वी पुलाचे काम सुरू न झाल्यास ६ जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी दिला आहे.

दरम्यान, दोन्ही पुलांच्या पुनर्बाधणीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीमार्फत सुमारे ३२ कोटी रुपयांची तरतूद केली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर दिनांक २४ डिसेंबर रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तालुक्यातील एमआयडीसी उपविभागीय कार्यालय उपअभियंता के. आय. हळदणकर यांनी १६ डिसेंबर रोजी पत्राद्वारे तांत्रिक अडचणी दूर करून काही दिवसांत काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच पोलिस प्रशासनानेही आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार २४ रोजीचे रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याची माहिती अडरेकर यांनी दिली आहे.

मात्र ५ जानेवारी २०२६ पूर्वी दोन्ही पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही तर ६ जानेवारी रोजी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अडरेकर यांनी दिला आहे. हा प्रश्न राजकीय नसून १६ गावांच्या जीवनाशी, सुरक्षिततेशी व रोजीरोटीशी संबंधित असल्याने प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 23/Dec/2025