रत्नागिरी : पोलिस दलाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘मिशन जीवन’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि विशेष उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी शहर विभागातील पाच पोलिसपाटलांचा विशेष सन्मान केला आहे.
ग्रामीण स्तरावर कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी या पोलिसपाटलांनी दिलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. मिशन जीवन अंतर्गत राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये मिरजोळे येथील पोलिसपाटील तेजल पाटील, भाट्ये येथील पोलिसपाटील अक्षता भाटकर, मिरजोळे ठिकाण दाते येथील पोलिसपाटील रजनीकांत पंड्ये, आंब्ये येथील पोलिसपाटील अंकिता सावंत आणि कसोप येथील पोलिसपाटील विनया साळवी यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले. ग्रामीण भागात रस्ते सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने दिलेली मदत आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेली जनजागृती यामुळे या पाचही जणांची कामगिरी उजवी ठरली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या सर्व पोलिसपाटलांच्या कार्याचे प्रत्यक्ष कौतुक करून त्यांना सन्मानित केले. पोलीस पाटील हा पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. मिशन जीवनच्या माध्यमातून या दुव्याने केवळ प्रशासकीय काम न करता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि समाज प्रबोधनासाठी मोठे कार्य केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 23/Dec/2025














