बदलत्या वातावरणमुळे पालेभाज्या महागल्या !

वाशी : बदलते वातावरण आणि वाढत्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्यावर होताना दिसतो आहे. उन्हाच्या वाढत्या प्रकोपामुळे पालेभाज्या लवकर खराब होत आहेत. बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने भाव वाढले आहेत.

काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ७० ते ८० रुपये प्रति किलोने मिळणाऱ्या मटारची किंमत १०० रुपयांच्या पार गेली असून, घाऊक बाजारात मटार १२० ते १४० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. एपीएमसीच्या घाऊक भाजीपाला बाजारात बुधवारी (ता. २३) ६०५ गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. त्यावेळी सर्वच भाज्यांचे भाव काहीसे चढेच असल्याचे पाहायला मिळाले. यात विशेषतः पालेभाज्यांच्या भावात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरूनदेखील भाजीपाला येत असतो; मात्र उशिरा आलेले पीक आणि बदलते वातावरण यामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे आठवड्याभरपासून पालेभाज्यांचे भाव वाढत असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले. परतीचा पाऊस आणि वाढत्या उन्हाचा प्रभाव भाज्यांवर आणि विशेषतः पालेभाज्यांवर होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. उष्णतेच्या प्रकोपामुळे हिरव्या भाज्या लवकर खराब होत असून त्यांची गुणवत्ता कमी होत आहे. त्यामुळे बराचसा भाजीपाला फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येत आहे. यात शेतकाऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच नुकसान झाले आहे. दिवाळीपर्यंत भाव चढेच राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 26/Oct/2024