रत्नागिरी : ९५ ग्रामपंचायतींमध्ये आज मिशन बंधारे मोहीम

पावस ः मिशन बंधारे उपक्रमांतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून तालुकास्तरावर एकाच दिवशी २३ डिसेंबर २०२५ रोजी ९५ ग्रामपंचायतींमध्ये मिशन बंधारे मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ५०० पेक्षा अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन असून, मिशन बंधारे मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी केले आहे.

या मोहिमेच्या नियोजनसंदर्भात पंचायत समिती स्तरावर बैठक घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत एकाच दिवशी ५०० हून अधिक बंधारे बांधले जाणार आहेत. या मोहिमेसाठी ग्रामपंचायत पातळीवर अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क अधिकारी व पंचायत समिती निहाय ग्रामपंचायत संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये विस्तार अधिकारी (कृषी, ग्रामपंचायत सांख्यिकी, शिक्षण) केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, तालुका अभियान व्यवस्थापक (एमएसआरएलएम) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

श्रमदानासह लोकसहभाग
श्रमदान तसेच लोकसहभागातून ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत पातळीवरील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व तसेच उमेद समूहातील महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 23-12-2025