सोलापूर : शाळांना रविवारपासून (ता. २७) दिवाळी सुट्या लागणार असून दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळा सुरू होतील. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ दिवाळीसाठी २६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या २५ दिवसांसाठी दररोज लांबपल्ल्याच्या ५०० बस सोडणार आहे.
यंदा दिवाळीच्या हंगामात एसटीची भाडेवाढ होणार नसल्याने बसप्रवास नेहमीच्याच तिकीट दराप्रमाणे करता येणार आहे. ‘महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत व ज्येष्ठांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. दिवाळीसाठी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नागपूर, मुंबई, नाशिक या विभागांसाठी विशेष नियोजन केले आहे. एसटी महामंडळाने दिवाळीसाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पण तो मागे घेण्यात आल्याने प्रवाशांना माफक दरात ‘लालपरी ‘तून सुरक्षित प्रवास करता येईल.
२६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत दररोज ५०० प्रमाणे २५ दिवसांत साडेबारा हजार बस २००हून अधिक लांबपल्ल्याच्या मार्गावर धावतील. दिवाळीसाठी महामंडळाने सुरू केलेल्या विशेष गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण देखील करता येणार आहे. २६ ते ३१ ऑक्टोबर या काळात महामंडळाच्या बसमधून लांबचा प्रवास करण्यासाठी तब्बल एक लाख १५ हजार प्रवाशांनी ऑनलाइन आरक्षण केले आहे.
दीपावलीनिमित्त नातेवाइकांना भेटायला उत्सुक असलेल्या सर्व प्रवासी बंधू- भगिनींना महामंडळाकडून सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा. आमचे चालक, वाहक व इतर कर्मचारी आपल्या सुखरूप प्रवासासाठी अहोरात्र काम करीत आहेत. प्रवाशांनी अवैध वाहतुकीऐवजी सुरक्षित एसटीचा वापर करावा. अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 26/Oct/2024














