रत्नागिरी : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने मेरी पंचायत अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार घरबसल्या एका क्लिकवर कळणार आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाकडून ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. विकासात येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रा. पं. च्या कारभारात पारदर्शकता असावी व आपल्या ग्रा. पं. च्या हद्दीत काय विकास सुरू आहे, गावात कोणत्या योजना आल्या आहेत, शासनाकडून किती निधी मिळाला, आदी माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने मेरीपंचायत अॅप आणले आहे. मेरी पंचायत अॅप हे केंद्र सरकारचे एक डिजिटल व्यासपीठ आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीचा कारभार, विकासकामे, निधीचा वापर आणि विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. हे अॅप ग्रामीण भागात ई-गव्हर्नन्स सुधारण्यासाठी पंचायतीच्या कामात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने विकसित केले आहे.
स्थानिक पातळीवरील एखाद्या विकास कामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकता. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामातील चुका किंवा त्या कामाचे कौतुक समोर आणता येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांना अभिप्राय नोंदवता येणार आहे.
मेरी पंचायत अॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा आर्थिक बाबीचा संपूर्ण लेखोजोखा ग्रामस्थांसमोर येणार आहे. त्यामुळे आपल्या गावांशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन वेळ घालवावा लागणार नाही.
अॅपवर काय माहिती मिळणार
मेरी पंचायत अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्य किती याची माहिती मिळेल. एकूण किती समित्या स्थापन केल्या असून त्यांचे अध्यक्ष कोण आहेत, नोटीस बोर्डाच्या माध्यमातून ग्रामस्थांना काय सूचना दिल्या आहेत, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान कोणत्या प्रकारचे आहे. कोणत्या योजनेतून विकास कामे सुरू आहेत, ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत, कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च केला, गावात पाण्याचे स्त्रोत व नळ कनेक्शन किती आहेत याची माहिती कळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 PM 23/Dec/2025














