रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अथक प्रयत्नातून रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) सुरू झाले आणि अवघ्या काही वर्षांतच जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत आमूलाग्र क्रांती झाल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी ज्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरला धाव घ्यावी लागत होती, त्या आता रत्नागिरीतच मोफत आणि यशस्वीरीत्या होत आहेत. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयावरचा रुग्णांचा विश्वास वाढला असून, ओपीडीची संख्या ५०० वरून दररोज ९०० च्या वर गेली आहे.
मेंदूच्या शस्त्रक्रिया आता रत्नागिरीतच! सर्वात मोठा दिलासा म्हणजे, आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जरीचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अपघात आणि मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया इथेच होत असल्याने रुग्णांना मुंबई-पुण्याला पाठवण्याचे (Refer) प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे.
- शल्यचिकित्सा विभाग: गेल्या दीड वर्षात १६४५ जनरल सर्जरी यशस्वी झाल्या आहेत. यात थायरॉइड, फुगीर शिरा आणि स्वादुपिंड खराब असलेल्या रुग्णांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
ऑर्थोपेडिक्स: गुडघे आणि खुबा बदलण्याचे प्रमाण वाढले हाडांच्या शस्त्रक्रियांमध्ये खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च येतो, तिथे शासकीय रुग्णालयात डॉ. देवकर आणि त्यांच्या टीमने क्रांती केली आहे.
- विशेष यश: ऑक्टोबर २०२५ मध्ये दुर्बिणीद्वारे गुडघ्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
- आकडेवारी: आजपर्यंत ५ हिप रिप्लेसमेंट (खुबा बसवणे), १० नी रिप्लेसमेंट (गुडघा बदलणे), ५ ऑर्थोस्कोपी आणि ३ स्पाईन सर्जरीसह एकूण ६१८ मेजर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
माता आणि बाल संगोपन: ७५० ग्रॅमच्या बाळाला जीवदान नवजात शिशु विभागात डॉक्टरांनी एका चमत्काराला गवसणी घातली आहे. मार्च २०२५ मध्ये अवघे ७५० ग्रॅम वजन असलेल्या आणि जगण्याची आशा कमी असलेल्या बाळावर डॉ. शयान पावसकर व डॉ. वडगावकर यांनी ६० दिवस अथक प्रयत्न केले. आज हे बाळ १६९० ग्रॅम वजनाचे असून ठणठणीत बरे झाले आहे.
- गायनॅकोलॉजी: डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड वर्षात २७२५ नॉर्मल डिलिव्हरी आणि १९७५ सिझर पार पडले आहेत.
ईएनटी आणि नेत्र विभागाची भरारी
- ENT: डॉ. बागे यांच्यामुळे आता दुर्बिणीद्वारे विनाटाक्याच्या शस्त्रक्रिया होत आहेत. यात नाकात/घशात अडकलेल्या वस्तू काढणे, कानाचा पडदा सांधणे (Tympanoplasty) आणि अन्ननलिकेच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
- नेत्र विभाग: जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या काळात तब्बल १०८० डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ मिळाले असून, हजारो गोरगरीब रुग्णांना याचा थेट फायदा होत आहे.














