◼️ पकडण्यासाठी ४ पिंजरे सज्ज; भक्ष्य म्हणून ठेवली शेळी
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी अभ्युदयनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिलेल्या निर्देशानंतर आता वनविभाग ‘अॅक्शन मोड’वर आला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने नरहर वसाहत परिसरात पिंजरा लावला असून, एकूण चार ठिकाणी पिंजरे लावले जाणार आहेत.
बिबट्यासाठी लावले ‘भक्ष्य’
शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी नरहर वसाहत भागात पहिला पिंजरा लावला आहे. बिबट्याला आमिष दाखवून पिंजऱ्यात अडकवण्यासाठी या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून शेळी बांधण्यात आली आहे. आमिषाला बळी पडून बिबट्या लवकरच जेरबंद होईल, असा विश्वास वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्र्यांच्या तातडीने सूचना
बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेली दहशत लक्षात घेता, पालकमंत्री उदय सामंत यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी बिबट्याला त्वरित जेरबंद करण्यासाठी कठोर उपाययोजना करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर वनविभाग कामाला लागला आहे.
नागरिकांनो सतर्क राहा: वनविभागाचे आवाहन
वन अधिकारी आणि कर्मचारी सध्या शहराच्या विविध भागांत रात्रंदिवस गस्त घालत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
रात्रीच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे.
लहान मुले आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी.
एकाकी भागात फिरणे टाळावे.
बिबट्याला पकडल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले जाईल, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 24-12-2025














