Dapoli : आंजर्ले गाव सापडलेय धुळीच्या विळख्यात

दापोली : तालुक्यातील दापोली पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले आंजर्ले गाव सध्या विकासाऐवजी धुळीच्या विळख्यात सापडले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत बंदिस्त विद्युतवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, या कामात संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अटी व शर्तीना हरताळ फासल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

विद्युतवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदताना, काम पूर्ण झाल्यानंतर दगडी सॉलिंग करून त्यावर रोड रोलरने दबाव देत रस्ता पूर्ववत करणे बंधनकारक असताना, संबंधित ठेकेदाराने केवळ जेसीबीच्या सहाय्याने खोदलेल्या रस्त्यावर माती ओढून काम उरकले आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकळी माती साचली असून, सुरू असलेल्या पर्यटन हंगामात वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसभर प्रचंड धूळ उडत आहे.

या धुळीचा फटका आंजर्ले गावातील उभागर, कोपरी, मुरडी या परिसरातील नागरिकांसह येथे येणाऱ्या पर्यटकांना बसत आहे. धुळीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून अनेकांना खोकला, श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही संबंधित यंत्रणा मात्र गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही, असे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभाग एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. यावर लवकर ठोस उपाययोजना न केल्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पर्यटन हंगाम सुरू असताना रस्त्यांची अशी दुर्दशा झाल्याने पर्यटकांची ये-जा मोठ्या प्रमाणात अडचणीत येत आहे. याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असून हॉटेल, होमस्टे, वाहनचालक आणि स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा द्यावी- मकरंद म्हादलेकर, पर्यटन व्यावसायिक, आंजर्ले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 24/Dec/2025