चिपळूण : चिपळूण शहराच्या नळपाणी योजनेला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला; पण गळती काही थांबलेली नाही. त्यामुळे गळतीच्या पाण्यासह या कामासाठी मंजूर केलेला निधीही वाहून गेला आहे. पालिकेच्या नळपाणी योजनेला गळती लागते आणि त्यात पालिकेचा निधी मुरतो, अशी स्थिती आहे.
कधी जॉईंटवर पाईप निघतात, तर कधी कपलिंगमध्ये लीकेज होती तर कधी पंपहाऊसमध्ये बिघाड होतो. तो सुरळीत करण्यासाठी एक-दोन दिवस जातात. सध्या पाणीपुरवठा विभागाला अधिकारीच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर हा विभाग चालू आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटली, तरी दुरुस्तीचे काम पालिकेला करावे लापते. त्यातून नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागते. निवडणुकीच्या तोंडावर शहरातील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आमिषे राजकीय पक्षाकडून दिली जात आहेत. त्याचवेळी शहरातील पाणीयोजनेला गळती लागून दोन ते तीन दिवस पाणी या मूलभूत गरजेसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यातून पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी किती सक्षम आहेत, हे दिसून आले.
चिपळूण शहराचा विस्तार झाल्यानंतर शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या वाढली, वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी आणि पुढील २५ पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेने २००८ मध्ये नवीन नळपाणी योजना राबवली. त्यानंतर आता ग्रव्हीटीने कोळकेवाडी धरणातून नागरिकांना पाणी देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. २००८ मध्ये सुरू केलेली योजना पूर्ण होण्यासाठी तब्बल आठ ते दहा वर्षाचा कालावधी लागला. अनेक ठिकाणी नागरिकांच्या त्रासाला ठेकेदाराला सामोरे जावे लागले. आता हाती घेतलेली ग्रव्हीटीची पाणीयोजना कधी पूर्ण होईल, हे निश्चीत नाही. कोळकेवाडी धरणातून नागरिकांच्या जमिनीतून पाईप टाकून हे पाणी चिपळूणला आणावे लागणार आहे. त्यासाठी किती शेतकरी जमीन देण्यास तयार होतील, हा प्रश्न अधांतरी आहे.
त्याशिवाय या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी सरकारकडून वेळेवर उपलब्ध होईल का, हा प्रश्न आहे. या योजनेसाठी पालिकेला तब्बल वीस कोटी रुपये भरावे लागणार आहे. तोही अजून पालिकेकडे उपलब्ध नाही. ग्रव्हीटीच्या पाणीयोजनेचे भवितव्य अजूनही अंधारात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडाचे लागणार आहे.
पालिकेच्या पाणी योजनेवर दुरुस्तीसाठी खर्च करावाच लागतो नाहीतर नागरिकांची अडचण होते. ज्या वेळेला पाणीपुरवठा बंद असतो त्यावेळी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. दुरुस्तीवर होणारा खर्च कमी करण्पासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मंगेश पेढावकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 26/Oct/2024














