◼️ कोरोना संपला, पण गाडी दादरला येईना; ‘दिवा’ स्थानकावर बोळवण केल्याने प्रवाशांचा संताप
मुंबई/रत्नागिरी : बाहेरच्या राज्यातील गाड्यांना मुंबईत यायला ‘रेड कार्पेट’ आणि कोकणातील गाड्या मात्र मुंबईच्या वेशीवर (दिवा) रोखायच्या, हा मध्य रेल्वेचा दुजाभाव आता चव्हाट्यावर आला आहे. कोरोना काळात बंद केलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर (Dadar-Ratnagiri Passenger) पुन्हा सुरू करण्यासाठी गेल्या ५ वर्षांपासून कोकणवासिय मागणी करत आहेत. मात्र, “मार्गाची क्षमता नाही” (No Track Capacity) असे कारण देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने आता मुंबई-बेंगळुरू अतिजलद गाडी सुरू करण्याचा घाट घातल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
१९९६ पासूनची हक्काची गाडी बंद का?
१९९६-९७ पासून सुरू झालेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही कोकणवासियांची जीवनवाहिनी होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, वसई, विरार आणि पालघर भागातील प्रवाशांसाठी दादर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ही गाडी अत्यंत सोयीची होती. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोनाचे कारण देत ही गाडी बंद करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये ‘मार्गाची क्षमता नाही’ आणि ‘वक्तशीरपणा’ (Punctuality) ही कारणे देत ही गाडी थेट दादरला न नेता ‘दिवा-रत्नागिरी’ अशी चालवली जाऊ लागली. मात्र, दिवा स्टेशनवरून ही गाडी चालवूनही तिच्या वक्तशीरपणात कोणताही सुधार झालेला नाही, उलट प्रवाशांचे हाल वाढले आहेत.
बेंगळुरूला जागा, मग कोकणाला का नाही?
मध्य रेल्वेने रत्नागिरी पॅसेंजर दादरला नेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, त्याच वेळी मुंबई-बेंगळुरू दरम्यान नवीन अतिजलद गाडी सुरू होणार आहे. जर रत्नागिरीच्या गाडीसाठी ट्रॅकवर जागा नाही, तर या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मार्ग कसा मोकळा होतो? असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली
दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि सकाळच्या सत्रात दादर-चिपळूण जलद पॅसेंजर सुरू करण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून मागणी होत आहे.
मार्च २०२३ मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वतः प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.
या बैठकीला प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, गोपाळ शेट्टी आणि आशिष शेलार यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते.
मात्र, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी वारंवार सांगूनही रेल्वे प्रशासन मुजोरपणाने वागत असल्याचे चित्र आहे.
हा महाराष्ट्रातील जनतेला थेट आव्हान –
अक्षय महापदी या दुजाभावावर प्रतिक्रिया देताना अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी म्हणाले, “रत्नागिरीची गाडी मुंबईबाहेर (दिवा) थांबवून त्या मार्गावर इतर राज्यांत जाणाऱ्या गाड्या सुरू करणे, हे महाराष्ट्रातील जनतेला थेट आव्हान देण्यासारखे आहे. आमचा याला ठाम विरोध आहे. कोकणवासियांवर होणारा हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही.”
आता तरी रेल्वे प्रशासन जागे होणार की कोकणच्या प्रवाशांना पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 24-12-2025














