चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग पाचव्या वर्षी चिपळूण सायक्लोथॉन २०२५ चे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रापासून २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. सुरुवात होणार आहे. हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांपासून सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी खुला असणार आहे.
नियमित व्यायामाची सवय लागावी, आरोग्याबाबत जागरूकता वाढावी तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश समाजात पोहोचावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सदर सायक्लोथॉनमध्ये सायकल राईडचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून एम. के. थिएटर, पटेल प्लाझा, भेंडी नाका, उक्ताड, गोवळकोट कमान, लंडन रोड, गोवळकोट कमान, एन्रॉन पूल, फरशी तिठा, गांधारेश्वर पूल, रामतीर्थ, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असा असणार आहे. सुमारे १८ कि.मी.ची सायकल राईड आहे. सायक्लोथॉन यशस्वी पूर्ण करणाऱ्या सर्व सायकलस्वारांना पदक देण्यात येणार आहे. या उपक्रम दरम्यान सायकलिंगचे फायदे, सायकलिंग स्पर्धांचे प्रकार, तंत्रशुद्ध सायकल चालविण्याची पद्धत, योग्य सायकलची निवड आदी विषयांवर मार्गदर्शनपर माहिती देण्यात येणार आहे. इच्छुकांनी www.chipluncyclingclub in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 24/Dec/2025














