दापोली : दापोली तालुक्यात खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसून येत आहे. चायनीज सेंटर, भेळपुरी गाड्या, बेकरी येथे स्वच्छतेचे किमान निकषही पायदळी तुडवले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागांची कारवाई केवळ कागदावरच सीमित राहिली आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ, दूषित पाण्याचा वापर, हातमोजे व टोपीशिवाय पदार्थ हाताळणे, अस्वच्छ भांड्यांतून विक्री तसेच कालबाह्य साहित्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे वास्तव आहे. काही ठिकाणी तर दुर्गंधी, माशा आणि घाणीच्या वातावरणातच खाद्यपदार्थ विकले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी पोटदुखी, जुलाब, उलटी, अन्नविषबाधा यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पर्यटन हंगामात दापोलीत राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. ‘पर्यटननगरी’ म्हणून ओळख असलेल्या दापोलीतच जर अन्नस्वच्छतेचा असा बोजवारा उडत असेल, तर तालुक्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसणे अपरिहार्य आहे. विशेष म्हणजे अधूनमधून एखादी धाड टाकून काही विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशी स्थिती दिसून येते.
यंत्रणांची ही उदासीनता नेमकी कुणाच्या दबावाखाली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य धोक्यात घालणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई कधी होणार? नियमित तपासण्या केव्हा सुरू होणार? दोषींवर परवाने रद्द करण्याची हिंमत प्रशासन दाखवणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. खाद्यपदार्थ स्वच्छतेकडे दुर्लक्ष म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. संबंधित यंत्रणांनी मूग गिळून बसण्याऐवजी तातडीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 24/Dec/2025














