राजापूर/रत्नागिरी : राजापूर शहरात न्यायालयाच्या (Court) समोरच एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. कोर्टाच्या कामासाठी आलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पायावरून भरधाव कार गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी (दि. २३ डिसेंबर) दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी कार चालकावर भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोर्टात जाण्यासाठी थांबल्या होत्या, तितक्यात…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उर्मिला लक्ष्मण कोकाटे (वय ६५, रा. केळवली, ता. राजापूर) या सोमवारी दुपारी राजापूर न्यायालयात जाण्यासाठी आल्या होत्या. न्यायालयाच्या समोर असलेल्या पंढरपुरी चाय विक्रीच्या टपरी जवळ रस्त्याच्या कडेला त्या उभ्या होत्या. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका लाल रंगाच्या चार चाकी गाडीने त्यांना धडक दिली.
उजव्या पायावरून नेली गाडी
गाडी क्रमांक MH 08 AX 6702 वरील चालक शाहिदली मोहम्मद सलीम चौगुले (रा. राजापूर) याने आपल्या ताब्यातील वाहन हलगर्जीपणे आणि निष्काळजीपणे चालवत उर्मिला कोकाटे यांच्या उजव्या पायावरून नेले. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. भररस्त्यात आणि कोर्टासमोरच हा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
चालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी जखमी उर्मिला कोकाटे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कार चालक शाहिदली चौगुले याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २४४/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS) चे कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि १२५ (अ) (दुसऱ्याचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 24-12-2025














