रत्नागिरी : रत्नागिरीत परिवर्तन घडवायचे आहे, असा निर्णय रत्नागिरीकरांनी घेतला आहे. गेल्या वीस वर्षांत विकासकामे झाली नाहीत. फक्त कोटींची उड्डाणे होत असल्याच्या घोषणा झाल्या. आरोग्य, शिक्षणव्यवस्था नीट नाही. कोणत्याही नव्या कंपन्या आल्याच नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढली व अनेकांना रत्नागिरी सोडून जावे लागत आहे, ही दयनीय स्थिती बदलण्यासाठी परिवर्तन व्हायला हवे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी केले.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात आयोजित महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या सभेत माने म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी राऊत यांना ८५ हजार मते मिळाली. ही महाविकास आघाडीची ताकद आहे. ही मते वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. ही निवडणूक रत्नागिरीकराच्यादृष्टीने महत्वाची आहे. ज्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीत गाडायचे आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्यालाच मिळणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतांनी विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीवेळी काही गोष्टीत आपण कमी पडलो असल्यास त्यात सुधारणा करूया, असे सांगितले. रमेश कीर, बशीर मुर्तझा यांनीही मार्गदर्शन केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल निशाणी घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागणार आहेत याशिवाय प्रचाराचे साहित्यसुद्धा लवकरच दिले जाणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी कार्यकत्यांसाठी प्रचाराला सुरवात करावी, असे सांगण्यात आले.
या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे बशीर मुर्तझा, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, राजन सुर्वे, अॅड. अश्विनी आगाशे, रूपाली सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख बड्या साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, काँग्रेसचे अनिरूद्ध कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या सूचना सांगितल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 26/Oct/2024