रत्नागिरी :
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, दुसरीकडे रत्नागिरी भाजपमध्ये मात्र मोठी अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि रत्नागिरीत भाजपची रणनीती सांभाळणारे अनिकेत पटवर्धन यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या कामातून अंग काढून घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर आपल्याच पक्षातील लोकांकडून होणाऱ्या टीकेने नाराज होऊन त्यांनी भाजपच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘एक्झिट’ घेतली आहे.
नेमका वाद काय?
रत्नागिरी नगरपालिकेच्या निकालानंतर अनिकेत पटवर्धन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत त्यांनी विजयाचे श्रेय देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उल्लेख केला, मात्र आपलेच नेते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख करणे टाळले, असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला.
यानंतर सोशल मीडियावर पटवर्धन यांच्या विरोधात पोस्टचा पाऊस पडला. एका पोस्टमध्ये त्यांचा उल्लेख “अहंकारातून उगवलेला स्वयंघोषित नेता” अशा शब्दांत करण्यात आला. “रत्नागिरीचा नेता म्हणून भासवण्याची त्यांची मानसिकता अहंकाराच्या टोकावर पोहोचली आहे,” अशी खरमरीत टीकाही करण्यात आली.
टीकेने व्यथित होऊन पटवर्धन यांचा मोठा निर्णय
आपल्यावर होणाऱ्या या वैयक्तिक आणि राजकीय टीकेनंतर अनिकेत पटवर्धन यांनी थेट रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाचे काम थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी ग्रुपवर टाकलेली पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
काय म्हटले आहे अनिकेत पटवर्धन यांनी पोस्टमध्ये?
“रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मी घेतलेली भूमिका अनेक जणांना पटलेली दिसून येत नाही. रवींद्र चव्हाण साहेब रत्नागिरी जिल्ह्यासाठी जे सांगतात, ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पक्ष वाढीसाठी आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी मी जे योगदान दिले, ते अनेक जणांना रुचलेले नाही.
त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मी कोणताही सहभाग घेणार नाही. रवींद्र चव्हाण साहेब ज्यांना जबाबदारी देतील, ते ती पार पाडतील. पण यापुढे मी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे कोणतेही काम करू इच्छित नाही. मी आजपासून माझी भूमिका थांबवत असून सर्व ग्रुपमधून स्वतःहून एक्झिट होत आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.”
आगामी निवडणुकांवर होणार परिणाम?
अनिकेत पटवर्धन हे रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. रत्नागिरीत भाजपचे संघटन आणि रणनीतीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, ऐन जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे रत्नागिरी भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. आता यावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














