भाजपमधील वादात ‘संकटमोचक’ म्हणून उदय सामंत यांची एन्ट्री! “अनिकेत पटवर्धन हे युतीचा महत्त्वाचा दुवा; त्यांची नाराजी मी स्वतः दूर करणार”

रत्नागिरी :
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी सोशल मीडिया वॉर आणि अंतर्गत टीकेला कंटाळून रत्नागिरीच्या राजकारणातून ‘एक्झिट’ घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, आता या वादात राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. “अनिकेत पटवर्धन हे युतीचा महत्त्वाचा दुवा आहेत, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी स्वतः रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलेन,” अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली आहे.

काय म्हणाले ना. उदय सामंत?
अनिकेत पटवर्धन यांच्या तडकाफडकी निर्णयावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी त्यांची पाठराखण केली आहे. सामंत म्हणाले की, “अनिकेत पटवर्धन हे केवळ रवींद्र चव्हाण यांचे पीए नाहीत, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि विश्वासू दुवा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात युती होण्यासाठी आणि महायुतीची सत्ता आणण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे.”

‘भाजपचा कार्यकर्ता म्हणून योगदान मोठे’
सामंत पुढे म्हणाले, “जरी ते रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक असले, तरी या निवडणुकीत त्यांनी एक निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ येणे योग्य नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात अनिकेत पटवर्धन सक्रिय राहिले पाहिजेत, कारण त्यांचा दांडगा जनसंपर्क भाजपला आणि पर्यायाने महायुतीला ताकद देणारा आहे.”

मी स्वतः रवींद्र चव्हाणांशी बोलणार
अनिकेत पटवर्धन यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि त्यांची नाराजी दूर व्हावी, यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. “मी स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी या विषयावर चर्चा करेन. अनिकेत यांची नाराजी दूर केली जाईल. महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेनेची हीच भूमिका आहे की त्यांनी सक्रिय राहावे,” असे वक्तव्य करून उदय सामंत यांनी अनिकेत पटवर्धन यांना मोठा दिलासा दिला आहे.
पालकमंत्र्यांच्या या मध्यस्थीनंतर आता अनिकेत पटवर्धन आपला निर्णय मागे घेणार का? आणि भाजपमधील हे सोशल मीडिया वॉर थांबणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.