राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी पदभार स्वीकारला

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी सहकारी नवनिर्वाचित नगरसेवकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत बुधवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी प्रतिस्पर्धी महायुतीच्या श्रुती ताम्हनकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता तर २० नगरसेवकांपैकी दहा जागी महायुती तर दहा जागी महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहेत.

बुधवारी नगराध्यक्षा खलिफे यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता गेले चार वर्षे असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून लोकप्रतिनिधींकडून कारभार सुरू झाला आहे.

बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अॅड. खलिफे यांनी नगर परिषदेत प्रवेश करत पद्भार स्वीकारला. तत्पूर्वी जवाहर चौकात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर जवाहर चौकातील दर्यावर त्यांनी चादर चढवून प्रार्थना केली. अॅड. खलिफे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी नगर परिषदेत प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

या प्रसंगी माजी आमदार गणपत कदम, जमिर खलिफे यांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, उबाठाचे रवींद्र डोळस, काँग्रेस शहर प्रमुख आजिम जैतापकर, उबाठाचे शहर प्रमुख संजय पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष सातोसे आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी भेटून नगराध्यक्षा अॅड. खलिफे यांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना भेटून शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 25/Dec/2025