◼️ व्यावसायिक ते लोकप्रतिनिधी; ‘क्रेडाई’च्या सदस्यांना आणि कुटुंबियांना मिळाली रत्नागिरीच्या विकासाची संधी
रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या जडणघडणीत आणि विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ‘क्रेडाई रत्नागिरी’ (CREDAI Ratnagiri) या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेसाठी आजचा दिवस अभिमानाचा ठरला. संघटनेचे सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत बाजी मारली आहे. आज गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी क्रेडाई रत्नागिरीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक श्री. सौरभ मलुष्टे आणि नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रीती रवींद्र सुर्वे यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
बांधकाम व्यावसायिक ते नगरसेवक :
त्नागिरीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि क्रेडाईचे सक्रिय सभासद असलेले श्री. सौरभ मलुष्टे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून दणदणीत विजय मिळवला आहे. एक व्यावसायिक म्हणून शहराचा विकास करत असताना आता लोकप्रतिनिधी म्हणून थेट जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्यांच्या निवडीमुळे बांधकाम क्षेत्रातील समस्या आणि शहरी नियोजनाचे प्रश्न पालिकेत प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रभाग ३ मधून प्रीती सुर्वे यांचा विजय
क्रेडाई रत्नागिरीचे आणखी एक ज्येष्ठ सभासद आणि बांधकाम व्यावसायिक श्री. रवींद्र सुर्वे यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रीती सुर्वे यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून विजय संपादन केला आहे. पती रवींद्र सुर्वे हे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असताना, पत्नी प्रीती सुर्वे यांनी राजकारणात प्रवेश करत नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला आहे.
क्रेडाई परिवारात उत्साहाचे वातावरण
आपल्याच क्षेत्रातील सहकारी आता शहराचे ‘कारभारी’ झाल्याने क्रेडाई रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, “शहराचे सुनियोजित विकास नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी हे दोन्ही नगरसेवक महत्त्वाची भूमिका बजावतील.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 25-12-2025














