Vaibhav Suryavanshi Rohit Sharma Virat Kohli, Vijay Hazare Trophy 2025-26: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ ची सुरुवात धमाकेदार झाली, पहिल्याच दिवशी शतकांचा वर्षाव झाला. त्यापैकी तीन शतकांनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले.
ती शतके म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि वैभव सूर्यवंशी. दोन अनुभवी भारतीय क्रिकेट दिग्गज आणि एक उदयोन्मुख स्टार तिघांनीही आपापल्या संघांना दमदार शतकांसह विजय मिळवून दिला. तसेच चाहत्यांचेही मनोरंजन केले. त्यापैकी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा खरा स्टार ठरला. त्याचे द्विशतक हुकले पण एका विशिष्ट बाबतीत त्याने रोहित-विराटच नव्हे तर इतर २१ फलंदाजांना मागे टाकले.
वैभवची तुफानी खेळी-
वैभव सूर्यवंशीचा विशेष धमाका
२४ डिसेंबरला सुरू झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी करत १९० धावा केल्या. वैभवला जे साध्य करता आले नाही ते ओडिशाच्या स्वस्तिक सामलने केले. त्याने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले. त्याने सौराष्ट्रविरुद्ध २१२ धावांची संस्मरणीय खेळी करत पहिले लिस्ट ए शतक झळकावले आणि इतिहास रचला. पण तरीही तो वैभवपेक्षा एका बाबतीत मागेच पडला.
रोहितचे दमदार दीडशतक-
वैभवचे सर्वाधिक षटकार
बिहारचा १४ वर्षीय सलामीवीर वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध फक्त ८४ चेंडूंचा सामना करत १९० धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एकूण १५ षटकार मारले, जे इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त आहेत. कर्नाटकविरुद्ध फक्त ३९ चेंडूंमध्ये १२५ धावा करणारा झारखंडचा कर्णधार इशान किशनने त्याच्या खेळीदरम्यान १४ षटकार मारले. तर रोहित शर्माने त्याच्या १५५ धावांच्या खेळीत नऊ षटकार मारले.
विराटची फटकेबाजी-
वैभव विराट-रोहितपेक्षा किती पुढे आहे?
एवढेच नाही तर, वैभवने सर्वाधिक बाऊंड्री (चौकार आणि षटकार) मारण्याच्या बाबतीत सर्व फलंदाजांना मागे टाकले. १५ षटकारांसह, वैभवने १६ चौकारही मारले. अशा प्रकारे त्याने तब्बल ३१ वेळा चेंडू बाऊंड्रीपार पाठवला. हा आकडा स्वस्तिकपेक्षाही जास्त ठरला. त्याने २९ बाऊंड्री (२१ चौकार, ८ षटकार) मारल्या. रोहित शर्मा या बाबतीत तिसऱ्या स्थानावर होता. त्याने ९ षटकार आणि १८ चौकारांसह एकूण २७ फटके सीमापार केले. तर १३१ धावांची खेळी खेळणारा विराट कोहली एकूण १७ बाऊंड्री (१४ चौकार, ३ षटकार) मारू शकला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 25-12-2025














