रत्नागिरी शहर परिसरात सीसीटीव्ही संच देखभाल करणाऱ्या कंपनीकडून ४३ लाखांची फसवणूक

रत्नागिरी : शहर परिसरात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल आणि इतर कामकाजाची पूर्तता करणे बंधकारक असते. परंतु, ही देखभाल दुरुस्ती त्या कंपनीकडून करण्यात आलेली नाही. या कामांच्या अटी व शर्थी भंग करणाऱ्या कंपनी संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल ४३ लाख ३५ हजारांची शासनाची फसवणूक झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक १७जानेवारी २०२३ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आली आहे. हेमंत गोपाळ थवानी आणि कुलदीप एराम अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील पोलिस निरीक्षक उमेश आव्हाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे अत्यंत महत्त्वाचे ‘रत्नागिरी सिटी सर्विलन्स प्रोजेक्ट’ अंतर्गत रत्नागिरी शहर परिसरात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे यांची देखभाल करणे, पुरवठा आदेशाप्रमाणे कामकाजाची पूर्तता करणे बंधनकारक होते. तरीही ‘प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक हेमंत थवानी आणि कुलदीप एराम यांना या गोष्टीची जाणीव असतानाही त्यांनी अटी व शर्थीचा भंग करून शासनाची एकूण ४३ लाख ३५ हजारांची फसवणूक केली. त्यांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(२), ३१८(३), २२१, २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 26/Dec/2025