चिपळूण शहर परिसरातील भंगार डेपोवर कारवाई करण्याची मागणी

चिपळूण : शहरातील ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या भंगार डेपोवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवक निहार कोवळे व संदीप भिसे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण शहरात ठिकठिकाणी भंगार डेपो आहेत. या डेपोला नगर परिषदेची कोणतीही परवानगी नाही. संबंधित जागा मालकांनी जागा भाड्याने देऊन हे डेपो उभारले आहेत.

या ठिकाणी केमिकलचे भंगारदेखील ठेवण्यात येते. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. शहरातील बहादूरशेख, ओअॅसिस हॉटेललगत, बांदल हायस्कूलसमोर, गुहागर रोड, शिव नदी, खाटी गल्लीजवळ अशा अनेक भागात भंगार डेपो उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणि अस्वच्छता असते. या भंगार डेपोमध्ये रासायनिक कंपन्यांमध्ये वापरले जाणारे केमिकलचे ड्रम व अन्य साहित्य असते. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात. या शिवाय परिसरात दुर्गंधी पसरले. पालिकेने या भंगार डेपोवर कारवाई करावी आणि हे भंगार डेपो उठवावेत व जागा मोकळ्या कराव्यात अशी मागणी कोवळे व भिसे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 26/Dec/2025