Khed : शिव प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात तात्पुरता बदल

खेड : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिव येथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गंभीर तक्रार अर्जाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तातडीचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी तक्रारीतील मुद्दे विचारात घेऊन डॉ. अक्षय अरविंद पवार व डॉ. नदाफ अल्ताफ हुसेन या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात तात्पुरता बदल केला आहे.
शिव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या १४ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांशी अपमानास्पद वागणूक, मानसिक तणाव निर्माण होईल असे

बोलणे, कामकाजात हस्तक्षेप, अनावश्यक दबाव, रजेबाबत अडवणूक व पैशांची मागणी, कार्यालयीन शिस्त न पाळणे, तसेच सेवाग्राही रुग्णांसमोर कर्मचाऱ्यांना कमी लेखणे, इत्यादी अनेक बाबींचा उल्लेख कर्मचाऱ्यांनी दि. २१ नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार अर्जात करण्यात आला होता. या प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत असून काही कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्यही बिघडत असल्याने त्याचा आरोग्य सेवांवरही परिणाम होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी, खेड यांचे पत्र, शिव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा तक्रार अर्ज आणि त्यावरील मंजूर टिप्पण्यांच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बदली करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार, पुढील आदेश होईपर्यंत डॉ. अक्षय अरविंद पवार यांची शिव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर डॉ. नदाफ अल्ताफ हुसेन यांना कोरेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात कामकाज पाहण्याचे असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र शिव येथील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवरजिल्हा परिषद प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतल्याचे स्पष्ट झाले असून आरोग्य सेवा सुरळीत व तणावमुक्त सुरू राहाव्यात, यासाठीच हा तात्पुरता बदल केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

डॉ. नदाफ यांच्याकडून आदेशास केराची टोपली
या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृत लेखी आदेश देऊनही अद्याप संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ हुसेन नदाफ यांनी बदली करण्यात आलेल्या ठिकाणी हजर न होता वरिष्ठाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 26/Dec/2025