निसर्ग संवर्धन करणाऱ्या ‘धनेश’ प्रजातीला वाचविण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी : भाऊ काटदरे

चिपळूण : निसर्ग संवर्धन करणाऱ्या धनेश पक्ष्याच्या (ककणेर) प्रजातीला वाचविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यासाठी पक्षीप्रेमींनी चळवळ उभारावी, असे आवाहन पक्षीमित्र व सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी आज (दि. २५) चिपळूणमधील सह्याद्री संकल्प सोसायटीच्या धनेश अर्थात हॉर्नबिल घरटी निरीक्षण व संरक्षण कार्यशाळेत केले. येथील वन विभागाच्या कम्युनिटी सभागृहात सह्याद्री संकल्प सोसायटी संस्थेच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संस्थेचे प्रतिक मोरे यांनी धनेश पक्ष्याच्या जीवनचक्राविषयी अनेक उत्सुकता निर्माण करणारी व आश्चर्यकारक माहिती सांगितली. त्यामध्ये धनेश अर्थात कोकणातील बोलीभाषेतील ककणेर हा पक्षी शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थान मित्र आहे. पक्ष्यांमध्ये धनेश हा शेतकरी म्हणून ओळखला जातो. निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मोठा सहभाग आहे. हा पक्षी कुटुंबवत्सल म्हणून ओळखला जातो. एकदा त्याची मादीशी जोडी जुळली की, त्यांची सोबत आयुष्याच्या शेवटपर्यंत राहते. हा पक्षी प्रामुख्याने झाडांची फळे खाऊन उपजिवीका करीत असतो. ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त आहे अशीच फळे खाऊन त्या फळांच्या माध्यमातून पाण्याची तहान भागवितो. तो कधीही जमिनीवरील पाणी पित नाही हे त्याचे वैशिष्ट्य आहे. प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर प्रजातीच्या वृक्षावरील फळे खाऊन व घनदाट जंगलातील उंच डेरेदार वृक्षावर डोलीच्या माध्यमातून घरटे निर्माण करून आपल्या साथीदारासोबत संपूर्ण आयुष्य एकत्रितपणे घालवितात.

अनेक धनेश पक्षी काही ठराविक कालावधीनंतर मोठ्या संख्येने एका ठराविक जंगली भागातील जागेत एकत्र येतात, जणूकाही त्यांचे स्नेहसंमेलनच होते आणि त्यातूनच नर व मादीची जववळीक होऊन हे दोन्ही पक्ष कौटुंबिक जीवन प्रवासासाठी घरट्याची जागा शोधायला लागतात. दरम्यान, नर पक्षी मादी पक्षीला विविध फळे आणून देतो.

प्रथम वर्ग संरक्षित प्रवर्गात समावेश
धनेश पक्ष्याचा शासनाच्या प्रथम वर्ग संरक्षित वन्यजीवांमध्ये समावेश आहे. मात्र, मोठ्या वृक्षतोडीमुळे त्याचा अधिवास संपत चालला आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे त्यांचे कुटुंबचक्र बदलत चालले आहे. झाडांना फळे येण्याच्या ठराविक हंगामात या पक्ष्यांचे प्रजोत्पादन होत असे. मात्र, आता वातावरण बदलल्यामुळे झाडांना फळे येण्याचा हंगाम देखील बदलू लागला आहे. त्याचे परिणाम त्यांच्या जीवनचक्रावर होऊ लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 26/Dec/2025