दरवर्षी येणारा २६ डिसेंबर हा माझ्यासह अनेकांना उत्सुकता वाढवणारा असतो. तसे पाहता या दिवसाचे रत्नागिरीवासीयांच्या आयुष्यात खूप महत्व आहे. वरवर पाहता दिवस येतात व जातात; पण काही दिवसाची आपण, आपले सर्वजण, आपल्याशी संबंधित सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत असतो. असा दिवस म्हणजे २६ डिसेंबर. कारण या दिवशी रत्नागिरी तालुक्यालाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या अल्प कार्यकाळात कामाची झेप व चुणूक दाखविली असे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या तब्बल नऊ खात्याचे माजी राज्यमंत्री तथा रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. श्री. उदयजी सामंत साहेब यांचा वाढदिवस यादिवशी असतो. त्यामुळेच सर्वाना या दिवसाची उत्सुकता असते. म्हणून आजच्या या शुभ दिवशी आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खुप – खुप शुभेच्छा.
सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत माननीय शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यभर पसरला. तत्कालीन काळात शरद पवार साहेबांच्या वलयामुळे अनेक तरुण नेत्यांना त्यावेळी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी मिळाली. तत्कालीन परिस्थितीत अशा असंख्य तरुणांपैकी एक म्हणजे डॉ. उदय सामंत. कारण रत्नागिरी जिल्ह्यात ही संधी विद्यमान आमदार उदयजी सामंत यांनी साधली आणि आपल्यातील सळसळत्या रक्ताला रत्नागिरी तालुक्यातील सर्वसामान्यांचा आवाज बनविला. त्यावेळी त्यांनी माझ्यासारख्या मोजक्याच लोकांना घेऊन सुरू केलेला हा प्रवास आज असंख्य लोकांच्या मनात जाऊन पोहचला. तेंव्हापासून त्यांनी पाठीमागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करत, आपल्यातील नेतृत्वाला कर्तृत्वाच्या जोरावर नवी किनार दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मागे हुकमी मतदारांची फळी उभी केली. विविध उपक्रम हाती घेऊन पूर्ण केले. यामध्ये त्यांना त्यांचे वडील आणि आम्हा सर्वांचे पितृतुल्य आदरणीय रविंद्र तथा अण्णा सामंत व आमदार किरणजी तथा भैय्याशेठ सामंत यांनी या उद्याच्या राज्य नेतृत्वाला भरारी घेण्याचे खूप मोठे बळ दिले.
विविध पदांच्या माध्यमातून वेगवेगळे लोकोपयोगी उपक्रम राबवत त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढत तरुणांच्या गळ्यातील ताईत बनतानाच, त्यांची साथ मिळवायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात साहेबांच्या सोबत फिरत असताना त्यांची तालुका फिरण्याची गती अफाट होती. तीच गती साहेबांनी आजही कायम ठेवली आहे. फरक एवढाच आहे की, ती गती आता तालुका नव्हे तर राज्यभर झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून अगदी तरुण वयात २००४ मध्ये त्यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आमदारकी मिळाली. आणि महत्वाचे म्हणजे त्यांनीही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ती आजपर्यंत टिकवली. याकाळात अनेक अडचणी आल्या. आरोप – प्रत्यारोप झाले. मात्र साहेबांनी लोकमाणसवर सोडलेली छाप कायम ठेवली. रस्ते, पाणी, वीज, उद्योग, शिक्षण, मासेमारी, इत्यादी क्षेत्रात अनेक गोष्टी त्यांनी आपल्या कल्पकतेने राबवत लोकांचे प्रश्न सोडविले.
लोकसंग्रह करतानाच आपल्या विचारांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, आरोग्य, क्रीडा, साहित्यिक, नाटय यासारखे विविध क्षेत्रातही आपल्या लोकोपयोगी हिताच्या कामाचा ठसा उमटवला. त्याठिकाणी नवनवे बदल घडवून आणले. परिणामी या क्षेत्रातील मान्यवरांना आपलेसे करत आपली एक नवी वैचारिक बैठक निर्माण केली.
आजच्या घडीला आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या संवाद चातुर्यामुळे प्रत्येकाला वाटते की, साहेब आपलेच आहेत व आपल्यासाठीच आहेत. विशेष म्हणजे हे प्रत्येकाचे असे वाटणे, साहेब नियमित जपत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात असणारी गर्दी ही बरेच काही सांगून जाते.
सन २००४, २००९, २०१४, २०१९ आणि नुकत्याच झालेल्या २०२४ ह्या चारही विधानसभा निवडणुकीत त्यांनी दणक्यात विजय मिळविताना आपल्या लोकप्रियतेची कसोटी सिद्ध केली. त्यामुळेच त्यांच्यातील या लोकप्रिय गुणांचा आधार घेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तेही अगदी नऊ खात्याचे मंत्री म्हणून. अगदी कमी वयात ही जबाबदारी त्यांनी स्वीकारतानाच या सर्व खात्याला एक प्रकारची शिस्त आणली व जे काम त्यांच्याकडून अपेक्षित होते ते काम त्यांनी करून दाखविले. या सर्व खात्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला अभ्यासपूर्ण मंत्री महोदयांची ओळख झाली. रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणारे आमचे साहेब, अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके मंत्री झाले. यापेक्षा दुसरा आनंद आमच्या आयुष्यात नव्हता.
या सर्वांचा परिणाम असा झाला की, त्यांना मागील सरकारमध्ये म्हाडाचे अध्यक्ष, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्रिपद मिळाले. तेथेही त्यांनी आपल्या नेतृत्वाचे गुण दाखवत, अगदी कमी कालावधीत लोकांच्या हिताचे निर्णय घेतले, अंमलात आणले. म्हाडाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात कामे होतात हे त्यांनी पहिल्यांदा राज्याला दाखवून दिले. म्हाडाची नवी ओळख साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वामुळे महाराष्ट्राला दाखवून दिली. एवढेच नव्हे तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री असताना त्यांनी विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारे कार्य त्या विभागातून घडवून आणले. इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना चॉईस म्हणून कॉलेज देताना मर्यादा होती. ती मर्यादा साहेबांनी दूर करत मर्यादित तब्बल ३०० कॉलेज भरण्याची सवलत दिली. हा निर्णय राज्यातील समस्त विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरत आहे. कोविड – १९ काळात साहेबांनी उच्च शिक्षणाच्या बाबतीत अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले.
आज बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्यांच्यातील संघटन कौशल्य ओळखत त्यांना नेतेपद दिले आणि साहेबांनीही या नेतेपदाचा वापर करत रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण आणि महाराष्ट्रात संघटना वाढीस खूप मोठे योगदान देत आहे. यावेळी त्यांच्यावर अनेक टीका – टिप्पणी झाली, होते. पण तरीही अत्यंत संयमाने त्यांनी ही परिस्थिती हाताळली.
एखाद्याच्या कर्तृत्वाची उंची मोजायची असेल तर त्यांच्या वर्तनातून ती दिसून येते. आदरणीय अण्णा सामंत व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्वरूपा काकी यांच्या संस्काराचे बीजारोपणच त्यांच्यातील मोठेपणात दिसून येते. त्यामुळे आजही आदरणीय साहेबावर विरोधक अनेक प्रकारचे त्यांचे खच्चीकरण व्हावे यासाठी हल्ले करतात; पण आदरणीय साहेबांच्या मनावर संस्कारच एवढे मजबूत की, साहेब कधी त्यामुळे हलले आहेत, खचले आहेत, डगमगले आहेत कधी असे जाणवले नाही. एखाद्या आक्रमणाने साहेब संपले असे कधीच जाणवत नाही. त्यामुळे की काय अनेक जण अगदीं विरोधकासह साहेबांचे खाजगीत कौतुक करतात.
म्हणूनच आजच्या वाढदिवसाचे वर्णन करायचे असेल तर,
•आज वाढदिवस सातत्याने नाविन्याचा ध्यास घेत, विविध उपक्रमांच्या माध्यमातून विकासकामांचा मोठा प्रवाह सर्वसामान्यापर्यंत पोहचवणाऱ्या एका ध्येयवेड्या विकासरत्नांचा.
•आज वाढदिवस आहे शासन, प्रशासन, नोकरशाही, समाज आणि सर्वांनाच प्रिय असणाऱ्या आणि सर्वसामान्याच्या अडचणीत नेहमी धावून येणाऱ्या एक जिगरबाज नेता असणाऱ्या उदयजी सामंत साहेबांचा....!!
म्हणूनच आजचा वाढदिवस सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. आजच्या दिवशी सगळीकडेच साहेबांच्या वाढदिवसाचे अप्रुप असते. परंतु हे सगळे काही सहजासहजी झाले नाही. त्यासाठी साहेबांनी अथक परिश्रम, चिकाटी यांच्या जोरावर सर्व रत्नागिरी तालुका, तालुक्यातील गाव न गाव आणि वाडी न वाडी पिंजून काढली. १९९९ पासूनचा साहेबांचा सहकारी असल्याने मी ठामपणे सांगू शकतो की, एवढ्या वर्षांत साहेबांनी कधीही सुट्टी घेतली नाही वा कधी विश्रांती घेतली नाही. सातत्याने रत्नागिरी, कोकण आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास कसा काय साधता येईल यासाठी ते कार्य मग्न असतात. परिणामी आज अशी परिस्थिती अशी आहे की, रत्नागिरी तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, साहित्यिक वा आध्यत्मिक कार्यक्रमात सामंत साहेबांची उपस्थिती ही नित्याची बाब झालीच; त्यापेक्षा सामंत साहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी लोकांचा असणारा आग्रहच साहेबांची लोकप्रियता व त्यांचे जनमानसातील स्थान सांगून जातो. त्याला कारणही तसेच आहे. समाजकारण करताना माझ्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कामाचा योग्य सन्मान झाला पाहिजे हा आदरणीय सामंत साहेबांचा अट्टाहास आजच्या स्वार्थीपणाच्या राजकारणातही मनाचा ठाव घेतो. परिणामी आदरणीय सामंत साहेबांचे प्रत्येकाच्या मनातील स्थान अढळ बनत जाते.
ही आदर्शवत आपुलकीच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाते. आणि अजूनही वरचेवर घेऊन जाणार. असे म्हणतात की, ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगायला मिळते, अनेकांच्या जीवनात ज्यांच्यामुळे परिवर्तन घडते, अनेकांना आधार मिळतो तेच खरे आयुष्य जगत असतात. ही उक्ती साहेबांच्या आचारशील वर्तुणुकीला साजेशी ठरते. कोणताही भेदभाव न करता आपल्या सहवासात असलेल्यानाच नव्हे तर सर्वांनाच जगण्याची उमेद देत असतात. धर्म, जात, पंथ, समाज न बघता आपण काम करताना अनेक माणसे जोडली. नुसतीच जोडली नाहीत तर त्यांना काम करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच आदरणीय सामंत साहेब हे जगावेगळे ठरतात.
समाजकारण असो व राजकारण दोन्ही ठिकाणी आदरणीय सामंत साहेबांनी आपले वेगळेपण जपले. यासोबतच साहेब रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या, जयहिंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्यक्रम करत परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतात. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे इत्यादी ठिकाणी आदरणीय सामंत साहेबांनी विविध संघटनाच्या माध्यमातून राबविलेले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, वैज्ञानिक, पर्यावरण विषयक, समाजप्रबोधक इत्यादी उपक्रम काळाच्या ओघात कायम चिरकाल टिकतात व पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतात.
मागील अनेक वर्षे आदरणीय सामंत साहेबांच्या सहवासात त्यांना जवळून पाहता आले, अनुभवता आले. आजही साहेबांनी मारलेली ओ आबा ... ही हाक जगातील सर्वांत मोठा आधार देऊन जाते. मुळामध्ये सामंत साहेब आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्याशी मागील अनेक वर्षाचा कौटुंबिक संबंध जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना, त्यांनीही आजपर्यंत अतिशय प्रेमळ वातावरणात वाढविले आहे. मग सामंत साहेब असू देत, आमदार किरण भैयाशेठ असू देत किंवा आदरणीय अण्णा असू देत किंवा काकी या सर्वांनीच अतिशय जिवापाड प्रेम आयुष्याच्या वळणावरील त्या - त्या टप्प्यावर माझ्यावर केले. त्यामुळे आजही प्रचंड अभिमान वाटतो की, मी सामंत साहेबांसोबत आहे. नामदार सामंत साहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ - उतार आले. लोकांची गरज लक्षात घेऊन आणि होणारी घुसमट टाळण्यासाठी अनेकदा वेगळा मार्ग निवडावा लागला. त्या - त्या वेळी साहेबाच्या विचारांवर विश्वास ठेवून साहेबांचा मार्ग निवडला. म्हणूनच अगदी सुरुवातीपासून सामंत साहेबांनी सुचवायचे आणि आम्ही त्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरायचे हाच शिरस्ता, आजही कायम आहे. अगदी निर्विवादपणे आणि मनात कसलाही किंतु - परंतु न ठेवता सामंत साहेबांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहण्याचा योग आला आणि आज मात्र मला पाठीमागे वळून पाहताना अभिमान वाटतो. या काळातही सामंत साहेबांच्या सोबत राहिल्याचा आणि सामंत साहेबांनी तेवढ्याच आत्मीयतेने पाठीवर हात ठेवून लढण्याची प्रेरणा दिली आहे.
एवढ्या मोठ्या राज्याच्या उद्योग विभागाचा असो वा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा असो वा म्हाडाचे अध्यक्षपद असो इतर विभागाचे मंत्रीपद मात्र साहेबांचे आपल्या मतदारसंघावर असणारे लक्ष कमी होत नाही. आजही त्यांना रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या गावात परिपूर्ण माहिती, गरजा, उपलब्धता असणाऱ्या बाबी याची परिपूर्ण माहिती असते. यातच त्यांचा अभ्यास दिसून येतो
साहेब, आपणांस पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. खूप मोठे आहात. अजून खूप मोठे व्हा. जगाला हेवा वाटेल एवढी प्रगती करा.
धन्यवाद.
माननीय नामदार उदयजी सामंत साहेब
- रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे मागील वीस वर्षे प्रतिनिधित्व करत असताना लोकांच्या प्रश्नाला न्याय देत, शासन दरबारी असणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य लोकांच्यासाठी आणून, संपूर्ण मतदारसंघांमध्ये विकासाचे नवे स्वरूप आणण्यात अग्रेसर असणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय सामंत साहेब.
- महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित असणारे उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना कोविड काळामध्ये इंजीनियरिंग सह सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि आशा देण्यामध्ये साहेबांचा हातखंडा होता.
- कोविड मुळे शिक्षणाचे व शैक्षणिक वर्षे वाया जाणार या विचाराने नैराश्यात ग्रासलेल्या तरुणांईला कोविड काळामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विविध संकल्पनांच्या द्वारे अत्यंत समाधानकारकरीत्या तरुणांच्या मध्ये नवा उत्साह निर्माण केला!
- पूर्वी एखाद्या तरुणाला इंजिनिअरिंगची चॉईस भरण्याचे चान्सेस मर्यादित होते, मात्र नामदार साहेबांनी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील तब्बल 300 कॉलेजची नावे भरण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि तो निर्णय घेतला!
- या विभागासोबतच त्यांनी मराठी भाषा विकासाचे मंत्री म्हणून कार्य करत असताना मराठी भाषा सर्व दूर पोहोचविण्यासाठी आणि शासन दरबारी मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होण्यासाठी अनेक शासन निर्णय कार्यान्वित केले. त्यामुळेच मराठी भाषा ही सर्व दूर पोहोचण्यास मदत झाली.
- शासन व प्रशासनामध्ये अत्यंत महत्त्वाचा दुवा बजावत प्रशासनाला विश्वासामध्ये घेऊन शासनाच्या अनेक योजना ह्या सर्व दूर गेल्या पाहिजे, असे नेहमी म्हटले जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सामंत साहेब.
- रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून अनेक योजना कार्यन्वित होताना आपल्याला दिसत आहेत. त्या सर्वांचा एक भाग म्हणून आपल्या सर्वांना खुप अभिमान आहे.
- साहेब पुन्हा एकदा आपल्या वाटचालीचे एक सहकारी म्हणून कौतुकच आहे, त्यासोबतच आपल्या पुढील वाटचालीस खुप – खुप शुभेच्छा!
शुभेच्छूक – श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील,
अध्यक्ष – कवी केशवसुत स्मारक, मालगुंड,
संचालक – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
उपजिल्हाप्रमुख – रत्नागिरी जिल्हा,
माजी सभापती तथा संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा रत्नागिरी,
माजी सदस्य – पंचायत समिती, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:21 26-12-2025














