रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांची सुरक्षा, विशेषतः महिला प्रवाशांची सुरक्षितता, सर्वोतपरी मानून महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत महामंडळाच्या रत्नागिरीसह ४८ बसस्थानकांवर महिला सुरक्षा रक्षक यांची नेमणूक केली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील बस्थानकांवरील पाकीटमार, चोरी, महिला छेडछाडीला आळा बसला असून, मनोरुग्ण महिला, घर सोडून आलेल्या महिलांना सुरक्षा रक्षकांनी मदत केली आहे.
महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्याच्या माध्यमातून महिला सुरक्षा रक्षकांनी प्रवाशांची सुरक्षा, घातपातापासून दक्षता, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांबद्दल जागरूकता आणि प्रवाशांना मदत करणे यासाठी महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्व स्थानकांवर पाकीटमार, चोरी, महिला छेडछाड, घर सोडून आलेल्या महिलांना मदत,
मनोरुग्णांना मदत यासारख्या ७०६ घटनांमध्ये सुरक्षा रक्षकांनी जबाबदारीने कामगिरी बजावली आहे. त्यातील ३० प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत.
या कालावधीत १८२ प्रकरणांमध्ये महिलांची छेडछाड, विद्यार्थिनीची छेडछाड, महिलांचे दागिने, पैसे चोरणे, मनोरुग्ण महिलांना व घर सोडून आलेल्या महिलांना मदत पुरवणे, अशा विविध गुन्हेगारी व सामाजिक स्वरूपाच्या घटनांना सुरक्षा रक्षक व महिला सुरक्षा रक्षकांनी अत्यंत दक्षतेने हाताळून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे सकारात्मक आणि प्रभावी कार्यवाहीमुळे प्रवाशांमध्ये विशेषतः महिला प्रवासी आणि विद्यार्थिनी यांच्यामध्ये सुरक्षिततेची दृढ भावना निर्माण झाली आहे.
सुरक्षा रक्षकांना दक्षतेच्या सूचना
सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत या कामगिरीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना अधिक दक्ष राहण्याबाबत व आपली कामगिरी सुधारण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात. त्यानुसार सुरक्षा रक्षकांकडून ही कार्यक्षम, दक्षतेची कामगिरी, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणाऱ्या घटनांना आळा घालण्यात महामंडळाला मोठे यश प्राप्त झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 PM 26/Dec/2025













